धुवाधार पाऊस!

By Admin | Published: August 6, 2016 12:56 AM2016-08-06T00:56:04+5:302016-08-06T00:56:18+5:30

जनजीवन विस्कळीत : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे; पडझडीत सुमारे ४० लाखांचे नुकसान; चांदोली धरणाचे दरवाजे उघडले; शिये-कसबा बावडा मार्ग बंद

Raining rain! | धुवाधार पाऊस!

धुवाधार पाऊस!

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धुवाधार पाऊस सुरू असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राधानगरीसह बहुतांश धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेने धोका पातळीकडे आगेकूच केल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तब्बल ६७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
गेल्या चार दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा नूर काही वेगळाच होता. पहाटेपासून एकसारखा पाऊस सुरू राहिल्याने गटारी सोडाच, पण रस्त्यांवर पाणी मावेना इतका वेग पाण्याला होता. जमिनी उमळल्याने शेतवडीत पाणीच पाणी दिसत आहे. बांधफुटीमुळे भात, नागली, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पंचगंगा, भोगावती, तुळशी, वारणा, कासारी, कुंभी, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी, दूधगंगा, शाळी, धामणी व जांबरे या नद्यांवरील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. धुवाधार पावसात आठ सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन २४ लाख ६० हजार, तर ७० घरांची अंशत: पडझड होऊन १५ लाख ४० हजार असे ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ७९१२ घनफूट विसर्ग सुरू असल्याने भोगावती नदीच्या पाण्याला फुग अधिक आहे. वारणा धरण ९१ टक्के भरल्याने सतर्कता म्हणून ८३१ घनफूट विसर्ग सुरू ठेवला आहे. त्याशिवाय कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी शुक्रवारी सकाळी आठ वाजता ३९.७ फुटांपर्यंत होती.सायंकाळी सहा वाजता त्यामध्ये तब्बल तीन फुटांनी वाढ होऊन ती ४१.८ पर्यंत पोहोचली आहे. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख २१ हजार ९३३ घनफूटची आवक, तर २ लाख ४० हजार ६९३ घनफूट पाण्याचा विसर्ग म्हणजे आवकापेक्षा दुप्पट विसर्ग होत असल्याने पंचगंगेच्या पाण्याची फुग काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.
ओढे-नाले तुटले
पावसाचा जोर इतका भयंकर आहे की, ओढे-नाल्यांनीही रौद्र रूप धारण केले आहे. ओढे ओव्हरफुल होऊन शेतवडीत पाणी घुसत असल्याने अनेक ठिकाणी ओढे-नाले तुटल्याच्या घटना घडल्या आहेत.

नऊ मार्गांवरील एस. टी. वाहतूक अंशत: बंद
रंकाळा-अणुस्कुरा, भोगाव, चौके, आरळे, चंदगड ते मांदवडे, भुजवडे, इब्राहिमपूर, कुरणे, गगनबावडा ते सांगशी या मार्गांवर पाणी आल्याने एस.टी.ची वाहतूक अंशत: बंद झाली आहे. जिथे पर्यायी वाहतूक उपलब्ध आहे, त्या मार्गे वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा-
हातकणंगले-२०.७५, शिरोळ-१८.८५, पन्हाळा-७१.४२, शाहूवाडी-७३, राधानगरी-६६, गगनबावडा-७६, करवीर-३५.२७, कागल-४०.७५, गडहिंग्लज-१९.५७, भुदरगड-४५.६०, आजरा-४५.२५, चंदगड-४३.८३.

धरणसाठा टी.एम.सी.मध्ये असा-
धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारी धरण क्षेत्रातील पाऊस
राधानगरी ८.३६१ ८.२९६ ९९ १२६
तुळशी ३.४७१ २.५८७ ७४ ११७
वारणा ३४.३९९ ३१.४९८ ९१ ७५
दूधगंगा २५.३९२ १६.६९० ६५ ११५
कासारी २.७५२ २.५३८ ९२ २३०
कुंभी २.७१३ २.६०५ ९६ १४७
पाटगाव ३.७१६ २.६३० ७० ६४


शिवाजी पूल अखेर बंद
कोल्हापूर : महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील १३८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या शिवाजी पुलावरील वाहतूक शुक्रवारी पूर्णत: बंद केली. वाहतूक बंद झाली तरी हौशी बघ्यांची गर्दी लक्षणीय होती. त्यामुळे या परिसराला अगदी पर्यटनस्थळासारखे स्वरूप आले होते. संततधार पावसामुळे दिवसभरात वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले. -वृत्त/पान २

पूररेषेतील नागरिकांचे स्थलांतर सुरू
पावसाचा जोर असल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नदीपात्रांसह नाल्यांमध्येही पाणी वाढत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पूररेषेत येणाऱ्या शहर, आसपासच्या भागांसह जिल्ह्यात रात्रीपासून नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले
आहे. -वृत्त/पान २

महाद्वार रोडवर घराची भिंत कोसळून वृद्धा ठार
दोघे जखमी : अतिवृष्टीचा परिणाम

Web Title: Raining rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.