कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला, राधानगरी, वारणा धरणातून विसर्ग सुरुच

By राजाराम लोंढे | Published: August 2, 2024 04:49 PM2024-08-02T16:49:12+5:302024-08-02T16:49:46+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित ...

Rains again picked up in Kolhapur district, discharge from Radhanagari, Warna dam continues | कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला, राधानगरी, वारणा धरणातून विसर्ग सुरुच

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला, राधानगरी, वारणा धरणातून विसर्ग सुरुच

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यात दिवसभरातील पाऊस पाहता कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे.

हवामान विभागाने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पाऊस सुरू असून गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे. जोरदार सरी कोसळत असल्याने सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे. पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने ते पुन्हा वाढू लागले आहे.

धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ५७८४, वारणातून ११५५२ तर दुधगंगेतून ९१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फुग वाढू लागली आहे. पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू असल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दुपारी एक नंतर पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे.

दरम्यान, शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला असला तरी सध्याचा जोर पाहता पाऊस अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.

पडझड काही थांबेना

यंदा पावसाबरोबर मालमत्तांची पडझड थांबण्याचे नाव घेईना. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५१ लाख ७१ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली

हातकणंगले, शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

Web Title: Rains again picked up in Kolhapur district, discharge from Radhanagari, Warna dam continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.