पावसाची उघडीप, मात्र पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 05:33 PM2020-08-19T17:33:28+5:302020-08-19T17:35:24+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी एक-दोन सरी वगळता पावसाची पूर्णत: उघडीप राहिली. आठ-दहा दिवसांनंतर सकाळी आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. राधानगरी धरणातील विसर्ग कायम असून वारणा व दूधगंगेचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागले आहे. पंचगंगेची पातळी सायंकाळी पाचपर्यंत केवळ एका इंचाने कमी झाली असून ती ४१.२ फुटांवर आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी एक-दोन सरी वगळता पावसाची पूर्णत: उघडीप राहिली. आठ-दहा दिवसांनंतर सकाळी आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. राधानगरी धरणातील विसर्ग कायम असून वारणा व दूधगंगेचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागले आहे. पंचगंगेची पातळी सायंकाळी पाचपर्यंत केवळ एका इंचाने कमी झाली असून ती ४१.२ फुटांवर आहे.
चार-पाच दिवस धुवादार पावसानंतर मंगळवार (दि. १८)पासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मंगळवारी रात्री काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. मात्र बुधवारी सकाळी आठ-दहा दिवसांनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडले. एकूणच पावसाचा जोर ओसरला असून, पुराचे पाणीही संथ गतीने का होईना, कमी होऊ लागले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.९३ मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६९.५० मिलिमीटर झाला. अद्याप ७७ बंधारे पाण्याखाली असून ३८ मालमत्तांची पडझड होऊन १२ लाख ९३ हजारांचे नुकसान झाले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धुवादार पावसाने दोन दिवसांत महापूर आणला होता. त्यानंतर गेले चार-पाच दिवस जोरदार पाऊस झाला आणि पुन्हा पूर आल्याने कोल्हापूरकर चांगलेच धास्तावले होते. मात्र दोन्ही वेळेला महापुराचे संकट येणार तोपर्यंत पावसाने उघडीप दिली.
धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये -
राधानगरी (८.२८), तुळशी ( ३.३१), वारणा (३१.६२), दूधगंगा (२३.५३), कासारी (२.३६), कडवी ( २.५२), कुंभी (२.४५), पाटगाव (३.७२).