पाऊस ओसरला आता मशागतींचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:00+5:302021-05-21T04:24:00+5:30
कोल्हापूर : वादळाचा जोर ओसरला तरी गुरुवारी सकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने मशागतीच्या कामाचा पूर्णपणे विचका झाला आहे. गुरुवारी ...
कोल्हापूर : वादळाचा जोर ओसरला तरी गुरुवारी सकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळत राहिल्याने मशागतीच्या कामाचा पूर्णपणे विचका झाला आहे. गुरुवारी दुपारनंतर कडक ऊन पडल्याने घात येईल त्याप्रमाणे आता खोळंबलेल्या मशागती वेग घेेणार आहेत. रोहिणी व मृगाचा पेरा साधण्यासाठी आता खऱ्या अर्थाने धांदल सुरू होणार असलीतरी कडक लॉकडाऊनमुळे बियाणे, खते मिळण्यात अडचणी येत असल्याने पेरा साधायचा कसा, याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. दरम्यान या एका वादळातून सावरत नाही तोवरच बंगालच्या उपसागरात यास हे चक्रीवादळ तयार असून त्याची तीव्रता शनिवारपासून वाढणार असल्याची वार्ता हवामान खात्याने दिल्याने शेतकरी धास्तावला आहे.
पाऊस जास्त झाल्याने अजूनही शिवारात पाय ठेवण्याऐवढीदेखील घात नाही. मशागतीचा जोर वाढला असताना चक्रीवादळाने अचानक तडाखा दिल्याने सर्व वेळापत्रकच बिघडून गेले आहे. आता रोहिणी नक्षत्रात चार दिवस बाकी असताना तो मुहूर्त साधण्यासाठी मशागती आटोपायच्या की पेरणी साधायची याचा गुंता होऊन बसला आहे. ज्यांनी शेत नांगरून टाकले आहे, त्यांना अन्य मशागती करता येईना झाल्या आहेत. बैलजोडी व ट्रॅॅक्टरसाठी एकाचवेळी मागणी वाढणार असल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठी धावाधाव करावी लागणार आहे. घात येईल त्याप्रमाणे आंतरमशागतीसह टोकणीच्या कामांना हात लावला जात आहे.
चौकट ०१
बांधावर बियाणे पोहोचवणे अवघडच
लॉकडाऊनमुळे बियाणे आणून ठेवायचे तर कुठून याची चिंता सतावत आहे. सर्व कृषी सेवा केंद्रे सध्या बंद आहेत. जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून शेतकऱ्यांना लागणारा माल थेट बांधावर पोहोचवा, असा पर्याय दिला आहे, पण शेतकऱ्यांची संख्या आणि कृषी सेवा केंद्रातील कर्मचारी संख्या पाहता हे अजिबात शक्य नसल्याने बियाणे खरेदी विक्रीचा मोठा पेच तयार झाला आहे.
फोटो: २००५२०२१-कोल-शेतकरी ०१, ०२
फोटो ओळ: वादळी पाऊस थांबल्याने मशागती पूर्ण झालेल्या ठिकाणी सध्या पेरणीच्या कामाची तयारी सुरू झाली आहे. कात्यायनी परिसरात धूळवाफ पेरणी झालेल्या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करण्यात शेतकरी गुंतले आहे. ऊन पडल्याने आंतरमशागती व पेरणीच्या कामासाठी म्हणून शेतमजूर महिला लगबगीने शिवाराकडे धाव घेत आहेत. (छाया: आदित्य वेल्हाळ)