पावसाचा जोर ओसरला
By admin | Published: July 19, 2016 11:46 PM2016-07-19T23:46:42+5:302016-07-19T23:50:10+5:30
दिवसभर ढगाळ वातावरण : गगनबावडा, शाहूवाडीत पाऊस; आठ बंधारे अद्याप पाण्याखालीच
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांत पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला असला तरीही मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. शहरात अधून-मधून पावसाच्या तुरळक सरी पडल्या. पंचगंगा नदीचे पाणी पात्रात गेले असल्याने राजाराम बंधाऱ्याजवळ पाणीपातळी १८ फूट १ इंच इतकी आहे. गेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यात सरासरी ६.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. राधानगरी धरण ८३ टक्के भरल्याने ते भरण्याची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्याच्या बहुतेक भागांतील नद्यांचा पूर ओसरला असल्यामुळे त्यांचे पाणी नदीपात्रांत गेले आहे. त्यामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते रिकामे होऊन त्या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली आहे. अनेक भागांत मंगळवारी कडकडीत ऊन पडले होते, तर कोल्हापूर शहरासह अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहिले होते. कागल, हातकणंगले, शिरोळ भागांत पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, करवीर तालुक्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत; तर शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यांत पावसाचा जोर अद्याप कायम आहे. गगनबावडा
तालुक्यात सर्वाधिक २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, त्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत एकूण ९७७९.३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे; तर दिवसभरात सरासरी ६.२२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत तुरळक पाऊस असला तरी
कडवी आणि कासारी ही दोन्हीही धरणे भरली असून, राधानगरी, कासारी व कुंभी ही धरणे भरण्याच्या तयारीत आहेत.
आठ बंधारे पाण्याखालीचगेल्या चार दिवसांत जिल्ह्याच्या काही भागांत संततधार सुरू असून, पावसामुळे अद्याप कोल्हापूर पद्धतीचे आठ बंधारे पाण्याखालीच आहेत. पाटबंधारे विभागाच्या नोंदीप्रमाणे पाण्याखाली असणाऱ्या बंधाऱ्यांवरील पाणीपातळी पुढीलप्रमाणे : सुर्वे २० फूट ६ इंच, रुई- ४८ फूट ६ इंच, इचलकरंजी-४६ फूट, तेरवाड-४३ फूट ९ इंच, शिरोळ-३४ फूट, नृसिंहवाडी- ३० फूट.पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे सात बंधारे
पाण्याखाली असून, भोगावती नदीवरील खडक कोगे हाही बंधारा पाण्याखाली गेला आहे.
कोल्हापूर शहरात औषध फवारणी पुराचे पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने औषध फवारणीचे काम सुरू आहे. याशिवाय पूर ओसरल्यामुळे छावण्यांतून घरात राहण्यासाठी परतलेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या औषधोपचारांसाठीही महापालिकेच्या आरोग्य विभागाची धावपळ सुरू आहे. याशिवाय डासांचा फैलाव होऊ नये म्हणून फॉगिंग यंत्रणाही सक्रिय झाली आहे. तसेच भुयारी गटारींमध्ये अडकलेला कचरा काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
आजऱ्यात पुन्हा पावसाला सुरुवात
पेरणोली : पेरणोलीसह आजरा तालुक्यात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. मुसळधार पावसानंतर आठ दिवस पावसाने दडी दिली होती. त्यामुळे रोप लावणीत पाण्याची कमतरता भासल्याने शेतकरी भयभीत झाला होता. परंतु, पुन्हा पावसाने सुरुवात केल्याने रोप लावणीला वेग आला आहे. पश्चिम भागात शेतीच्या कामाला पुन्हा जोर आला आहे.
कोदे तलाव भरला
साळवण : गगनबावडा तालुका म्हणजे निसर्गाने फु ललेली सौंदर्याची खाण आहे. त्या खाणीत अनेक रत्ने असून, कोदे हे त्यातील एक आहे. नुकत्याच झालेल्या धुवाधार पावसामुळे कोदे तलाव भरून ओसंडत असून, त्याच्या सांडव्यातून पडणारे मोत्यांसारखे शुभ्र पाणी बघून मन तृप्त होते. सभोवताली हिरव्यागार डोंगर रांगात किंचित दुधी लहरणारे पाणी, दुरवर कोसळणारा गाथाडीचा धबधबा, असे मनमोहक दृश्य टिपण्यास, त्याची मजा लुटण्यास पर्यटकांनी तलावावर एकच गर्दी केली आहे. ऊन-पावसाच्या लंपडावात व निसर्गाने उधळलेल्या सौंदर्यात कोदे तलाव म्हणजे निसर्गाच्या कोंदणात बसविलेला हिरा वाटतो.