डोंगरातून व गावातील पावसाचे येणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:40+5:302021-07-19T04:17:40+5:30
राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पा. ते टिक्केवाडी हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता गतवर्षी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून ...
राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पा. ते टिक्केवाडी हा दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता गतवर्षी सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून करण्यात आला.
रस्त्याचे काम चांगले झाले. मध्यंतरी मोठे वळण रस्ताही अवजड वाहनांना सुकर होईल असा केला. त्यामुळे या विभागातील वाड्या-वस्त्यांची दळणवळणाची चांगली सोय झाली, तर राधानगरी, भुदरगड तालुक्यांना जोडणारा रस्ता तयार झाला. महापुरात अनेक गावांचा संपर्क तुटतो; मात्र या रस्त्यामुळे अनेक गावांचा संपर्क साधला जात आहे.
मात्र, हा रस्ता करताना धामणवाडी गावात अगदी सुरुवातीला प्राथमिक शाळा आहे. या बाजूने डोंगरावरून व गावातील येणारे पाणी गटारद्वारे मोठ्या पाईपने रस्त्याला क्रास करून विकास सेवा संस्थेकडून गटराने खाली सोडणे प्रस्तावित आहे. तेथे कामासाठी पाईपसुद्धा आणून टाकल्या आहेत. या डोंगरमाथ्यावर पावसाळ्यात जोरदार पाऊस पडतो. सध्या जोरदार पावसाचे पाणी प्राथमिक शाळेत व पिकाऊ जमिनीत शिरत आहे. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. शाळा बंद असल्याने त्याकडे आता लक्ष नाही. मात्र, शाळा सुरू होताच मुलांच्या आरोग्यासाठी येथून पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. तरी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरच काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक, शेतकरी यांनी केली आहे.
यासाठी ग्रामपंचायत, शेतकरी यांनी जि. प. बांधकाम विभागाकडे व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मात्र, अद्यापही कोणतीच कार्यवाही न केल्याने संबंधित शेतकरी व ग्रामस्थ यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
फोटो : धामणवाडी येथे डोंगर व गावातील गटर यांचे पाणी शेतात शाळेकडे न सोडता क्राॅस पाईप टाकून गटार करण्यासाठी या पाईप आणून ठेवल्या आहेत.