कोल्हापुरात पावसाची उसंत; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 06:56 PM2020-08-18T18:56:42+5:302020-08-18T18:59:04+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत मात्र वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात फुटाने वाढली असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत.

Rainy season in Kolhapur; But an increase in river water levels | कोल्हापुरात पावसाची उसंत; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला, तरीही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे आगेकूच केली आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देकोल्हापुरात पावसाची उसंत; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत वाढपंचगंगेची दिवसभरात फुटाने वाढ : राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत मात्र वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात फुटाने वाढली असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. वारणा, दूधगंगा धरणांतून विसर्ग कायम असून अलमट्टी धरणातून प्रतिसेकंद २.५० लाख घनफूट पाण्याचा विसर्ग असल्याने महापुराचा धोका तूर्त तरी टळला आहे.

जिल्ह्यात गेले तीन-चार दिवस जोरदार पाऊस कोसळला. त्यात सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांची पातळी झपाट्याने वाढत गेली. सोमवारी (दि. १७) सायंकाळीच पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे आगेकूच सुरू केल्याने कोल्हापूरकरांचे धाबे दणाणले होते. मात्र मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. दिवसभरात अधूनमधून एक-दोन जोराच्या सरी वगळता उघडीपच राहिली.

धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप असल्याने विसर्ग कायम आहे, राधानगरी धरणाचा तीन क्रमांकाचा दरवाजा पहाटे साडेतीन वाजता; तर क्रमांक सहाचा दरवाजा चार वाजून ३५ मिनिटांनी बंद झाला. आता त्यातून प्रतिसेकंद ४२५६, वारणा धरणातून १२ हजार २६४, तर दूधगंगा धरणातून ७७०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारी दुपारी पंचगंगेची पातळी ४०.९ फूट असून ८७ बंधारे पाण्याखाली आहेत. आठ राज्य तर ३२ प्रमुख जिल्हा मार्ग बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

धरणसाठा टीएमसीमध्ये असा-
राधानगरी (८.२४), तुळशी (३.०६), वारणा (२४.७०), दूधगंगा (२२.१०), कासारी (२.३४), कडवी (२.४९), कुंभी (२.४२), पाटगाव (३.७०).

दृष्टिक्षेपात पाऊस -

  • सरासरी पाऊस - ४२.७३ मिलिमीटर
  • सर्वाधिक पाऊस - १०८ मिलिमीटर
  • अतिवृष्टी- १३ सर्कल
  • पडझड - ७० मालमत्ता
  • नुकसान - २५ लाख ६ हजार
  • बाधित कुटुंबे - ४१ (१८४ व्यक्ती)
  • धरणातील विसर्ग- राधानगरी (४२५६), वारणा - (१२२६४), दूधगंगा - (७७००).
  • अलमट्टी विसर्ग - २.५० लाख घनफूट

 

Web Title: Rainy season in Kolhapur; But an increase in river water levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.