वाऱ्यासह पावसाची उसंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:55+5:302021-05-18T04:23:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने काहीशी उसंत घेतली. रविवारी दिवस-रात्र जोरदार पाऊस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने काहीशी उसंत घेतली. रविवारी दिवस-रात्र जोरदार पाऊस कोसळल्याने काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऊसपिकाला मात्र हा पाऊस पोषक ठरला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाने गेली दोन दिवस गोवा, कोकणात धुमाकूळ घातला आहे. कोकणात वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा कोल्हापूर जिल्ह्यालाही फटका बसला. रविवारी दिवसभर सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. वाऱ्यांमुळे डेरेदार वृक्ष भुईसपाट झाले आहेत. रस्त्यावर तुटून पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा अक्षरश: खच पडला होता. लॉकडाऊन असल्याने वाहतूक कमी असली तरी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना कसरत करतच मार्ग काढावा लागला. रविवारी रात्रभर पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. सोमवारी सकाळीही अकरापर्यंत ग्रामीण भागात पाऊस राहिला. तौक्ते वादळ मुंबईहून गुजरातच्या दिशेने सरकत राहिले तसे वारे व पावसाची तीव्रता कमी झाली होती. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहरात मात्र वारे थांबले होते, आकाश काहीसे स्वच्छ झाले आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले.
जिल्ह्यात सध्या उन्हाळी भात, भुईमूग काढणी सुरू आहे. या पावसाने काढणी थांबली असून या पिकांचे नुकसान झाले आहेे.
शिवार पाण्यांनी तुडुंब
दोन दिवसांच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले होते. उसाच्या सरीत पाणी तुंबले आहे. पाऊस थांबला असला तरी किमान चार-पाच दिवस जमिनीला वापसा येणार नाही.
आडसाल ऊस, मका झाला आडवा
जुलै, ऑगस्टमध्ये केलेल्या उसाच्या आडसाल लागणी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या आहेत. वैरणीसाठीचा मका, गाजरी गवतालाही फटका बसला असून अनेक ठिकाणी मका भुईसपाट झाला आहे.
खरीप मशागत लांबणीवर
जिल्ह्यात अक्षयतृतीयेनंतर खरीपाचा पेरा सुरू होतो. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात भाताच्या धूळवाफ पेरणी अधिक होतात. ‘रोहिणी’ नक्षत्रात पेरले आणि ‘मृग’ नक्षत्रात पाऊस सुरू झाला तर पेरा साधला जातो. यंदा मात्र वादळी पावसाने हे वेळापत्रक काहीसे कोलमडण्याची शक्यता आहे. जमिनीला वापसा नसल्याने मशागत लांबणीवर पडणार आहे.
निरूत्साही वातावरण
जिल्ह्यात दोन दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घरी रहावे लागले. तरीही पाऊस, वारा आणि थंडी एकूणच निरूत्साही वातावरणामुळे घराबाहेर पडू वाटत नव्हते.
फोटो ओळी : कोल्हापुरात सोमवारी वाऱ्यासह पावसाने उसंत घेतली. मात्र, सकाळी ढगाळ वातावरण राहिले. (फोटो-१७०५२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)