राक्षसाला उठवला; आता महाग पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:45 AM2018-04-14T00:45:25+5:302018-04-14T00:45:25+5:30

Raised the demon; Now it will be expensive | राक्षसाला उठवला; आता महाग पडेल

राक्षसाला उठवला; आता महाग पडेल

Next


कोल्हापूर : ‘माझ्या गुरूने मला सांगितले होते की, राक्षस झोपला असेल तर त्याला झोपू द्यावे. त्याला उठविले तर महाग पडते. विरोधकांनी आता राक्षसाला उठवले आहे. तुम्हाला ते महाग पडेल,’ असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
एक थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही साधुसंत नाही. पाय पडला तर मुंगीसुद्धा दंश केल्याशिवाय सोडत नाही. मी तर या राज्यातील बलाढ्य नेता आहे. तुमच्या साऱ्या भानगडी बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरच्या वेशीवर असलेल्या गांधीनगर-उचगाव परिसरातील अवैध बांधकामे पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु २०१५ पूर्वीची अवैध बांधकामे दंड भरून नियमित करावीत, असा निर्णय राज्य सरकारनेच घेतला असल्याने ही बांधकामे पाडण्यास सरकारने स्थगिती दिली आहे. त्यावरून महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने पालकमंत्री पाटील यांच्यावर गेले दोन दिवस आरोप केले होते. ते वाचून संतप्त झालेले मंत्री पाटील यांनी अत्यंत त्वेषाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले.
चंद्रकांत पाटील शांत व मवाळ असल्याचे महाराष्ट्राला माहीत होते; परंतु ते चिडले तर काय करू शकतात, ते विधान परिषदेत तुम्ही पाहिले आहे. ते किती आक्रमक भाषण करू शकतात, त्याचीही झलक भाजपच्या मेळाव्यात महाराष्ट्राने अनुभवली आहे. विरोधक काहीतरी माहिती देतात आणि पत्रकारही काहीच शहानिशा न करता ती छापतात; कारण चंद्रकांत पाटीलच्या विरोधात छापले की पेपरवाल्यांचीही हेडलाईन होते; परंतु असे चुकीचे आरोप कुणी केले तर मात्र मी यापुढे गप्प बसणार नाही. मी पत्रकारांनाही हा इशारा देऊ इच्छितो. प्रत्येक गोष्टीत कोर्ट-कचेºया केल्याशिवाय मी राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुणाच्या अन्नात माती कालवायची नाही, असा संस्कार माझ्यावर झाला असल्याने आजपर्यंत मी कुणाच्या भानगडी बाहेर काढण्याच्या फंदात पडलो नाही. उलट चांगली सामाजिक कामे करण्यावरच भर देत आलो. या कामांबद्दल कधी चांगले म्हणण्याचा, माझे अभिनंदन करण्याचा मोठेपणा विरोधकांनी दाखविला नाही. या कामांतून मला मते मिळतील की नाही, हे आज सांगता येत नाही; परंतु त्या कामांचे मला आत्मिक समाधान मिळते. तथापि ते सगळेच सोडून नुसते खोटे आरोप माझ्यावर केले गेले तर मी ते कदापि खपवून घेणार नाही, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
व्हिक्टर पॅलेस, शालिनी पॅलेस घेतले...
मंत्री पाटील म्हणाले, ‘काचेच्या घरात राहणाºयांनी दुसºयाच्या घरांवर दगड मारू नयेत, याचे भान बाळगावे. गांधीनगर-उचगाव परिसरात माझी एक खोलीच नव्हे, तर गुंठाभर जमीनही नाही. त्यामुळे तेथील बांधकामांना पाठीशी घालण्यात माझा व्यक्तिगत काहीच स्वार्थ नाही. माझे स्वत:चे राहते घर सोडले तर कुठेही इंचभर मालमत्ता नाही. काहीनी आता चंद्रकांतदादांनी कोल्हापुरातील बंद पडलेले व्हिक्टर पॅलेस व शालिनी पॅलेस ही हॉटेल्स घेतली, अशीही चर्चा सुरू केली आहे. ती ऐकून माझे मलाच हसू येते. असे आणखी मी काय-काय घेतले याची माहिती जरा मला पत्रकारांनीच द्यावी,’ असेही मंत्री पाटील यांनी हसत-हसत सुचविले.
फस्त केलेल्या जागांची चौकशी
कोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसने थेट २०२४ साठीच तयारी करावी
राज्यातील काँग्रेसने ओमर अब्दुला यांचा सल्ला मानावा व त्यांनी २०१९ च्या नव्हे, तर २०२४ च्या निवडणुकीचीच तयारी करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. गेल्या चार वर्षांत भाजपने सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने निवडणुका लढवून उगीच श्रम व पैसा वाया घालवू नये, म्हणजे २०२४ ला तुम्ही ताकदीने आमच्याविरोधात लढू शकाल.

Web Title: Raised the demon; Now it will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.