शंकरराव माने यांचा पुतळा उभारा
By admin | Published: September 29, 2015 12:05 AM2015-09-29T00:05:21+5:302015-09-29T00:10:05+5:30
डी. वाय. पाटील : ‘स्वातंत्र्यसेनानी-माजी खासदार शंकरराव माने पथ’ नामकरण
कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यातील व स्वातंत्र्योत्तर काळातील कार्याचा व्याप पाहता स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने यांच्या गौरवार्थ पुतळा उभारण्यात यावा, अशी अपेक्षा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केली. यावेळी त्यांनी माने यांचा पुतळा उभारण्याचा सर्व खर्च स्वत: करण्याची तयारीदेखील दर्शविली.कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे महावीर महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाचे ‘स्वातंत्र्यसेनानी व माजी खासदार शंकरराव माने पथ’ या नामकरण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे तर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षात १९६९ मध्ये झालेल्या घडामोडींत शंकरराव माने यांच्यासमवेत आमदार म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत राहून व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपतिपदासाठी मतदान करता आले. माने यांनी स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांचा पुतळा उभारण्यात यावा.माजी आमदार मालोजीराजे छत्रपती म्हणाले, शंकरराव माने यांच्या सामाजिक, राजकीय कार्याने कोल्हापूरकरांची मान उंचावली आहे. स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापुरातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल विल्सनचा पुतळा उद्ध्वस्त करून याठिकाणी त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविला. त्यामुळे शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे खरे शिल्पकार शंकरराव माने व त्यांचे सहकारी आहेत.महापौर डकरे म्हणाल्या, महावीर महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाला शंकरराव माने यांचे नाव देऊन स्वातंत्र्यसेनानी व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करण्याचे भाग्य महानगरपालिकेला लाभले आहे.
कार्यक्रमास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, उद्योजक दिलीप मोहिते, प्रवीणसिंह घाटगे, दादासो लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, अॅड. गुलाबराव घोरपडे, प्रशांत चिटणीस, पोलीस गृह उपअधीक्षक अनिल पाटील, माजी पोलीस उपअधीक्षक सुरेश पवार, नगरसेविका सरस्वती पोवार, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अजित पवार, डॉ. संदीप नेजदार, राजाराम गायकवाड, निशिकांत मेथे, प्रदीप उलपे, सुभाष बुचडे, दत्तात्रय इंगवले, डॉ. आर. व्ही. भोसले, माजी जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील, शिवाजीराव चव्हाण, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, डी. डी. पाटील, आर. एस. पाटील, अनिल शिंदे, मधू बामणे आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजीव परिख यांनी आभार मानले.