बचत गटांच्या उत्पादनासाठी मॉल्स उभारू : केसरकर
By admin | Published: February 5, 2015 12:08 AM2015-02-05T00:08:12+5:302015-02-05T00:13:37+5:30
ताराराणी महोत्सवाला प्रारंभ : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्णांतील महिला बचत गट सहभागी
कोल्हापूर : बचत गटातील महिलांच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बाजारपेठ मिळण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, आदी ठिकाणी मॉल्स उभारू, असे आश्वासन ग्रामविकास, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दिले.येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर विभागीय पातळीवरील ‘ताराराणी महोत्सव २०१५’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सहकार, पणन व बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, अध्यक्ष विमल पाटील यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. १० फेब्रुवारीअखेर प्रदर्शन चालणार आहे.मंत्री केसरकर म्हणाले, सध्या नवी मुंबई येथे बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी एक मॉल आहे. याच धर्तीवर राज्यातील प्रमुख शहरांतही मॉल्स उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिणामी यावर मंत्रिमंंडळाच्या बैठकीत लवकरच हा निर्णय होईल. कोल्हापूरकरांच्या रक्तात आणि नसानसांत लढाऊपणा भिनला आहे. सर्किट बेंचसाठी सुरू असलेले आंदोलन हे एक उदाहरण आहे. माझे आजोळ आजरा आहे; त्यामुळे कोल्हापूरशी माझे अतूट नाते आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, अर्थशास्त्राच्या नियमानुसार महिला बचतगटाची प्रगती एका विशिष्ट टप्प्यात थांबली आहे. आता ज्या टप्प्यात आहे, तेथून अधोगतीला येऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आमचे सरकार प्रशासनाचे नसून जनतेचे आहे. तालुका पातळीवरील अपूर्ण विक्री केंद्रांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सचिवांकडून परवानगीसाठी प्रयत्न करणार आहे. सचिव परवानगी नाकारणारे कोण? हायवेशेजारी जागा शोेधून मॉल्स उभारले जातील. मॉल्स आणि तालुका विक्री केंद्रांत विक्री होतील त्या दर्जाच्या आणि तोडीच्या वस्तू तयार कराव्यात. अन्यथा विक्री केंद्र आणि मॉल्सना ‘थडग्या’चे स्वरूप येईल.
यावेळी अध्यक्षा पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, सीईओ अविनाश सुभेदार यांची भाषणे झाली. बहिरेवाडी येथील आयेशा महिला बचत गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाहीर आझाद नाईकवाडी यांच्या शाहिरीने कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील यांची भाषणे झाली. माजी अध्यक्ष संजय मंडलिक, अरुण इंगवले, सीमा पाटील, किरण कांबळे, उपायुक्त इंद्रजित देशमुख, उपस्थित होते. डॉ. एम. एस. निर्मळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दादांची ताकद मोठी
चंद्रकांतदादा चांगल्या अधिकाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी राहतात. कोल्हापूर जिल्ह्णातील चांगले अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्णासाठी मागितले आहेत. मात्र, ते सोडायला तयार नाहीत. राज्यात आणि दिल्लीतही त्यांची ताकद मोठी ताकद आहे, असे कौतुक मंत्री केसरकर यांनी केले.