मानसिंगरावांचे वर्चस्व राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे
By Admin | Published: May 28, 2017 01:31 AM2017-05-28T01:31:45+5:302017-05-28T01:31:45+5:30
शिराळा नगरपंचायतीवर सत्ता : जिल्हा परिषद, पंचायत समितीपाठोपाठ लक्षणीय विजय
विकास शहा । लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला, तर भाजपने सहा जागा जिंकून नगरपंचायतीत प्रवेश केला. मात्र कॉँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, जिल्हा परिषदेपाठोपाठ नगरपंचायतीवरील वर्चस्व राष्ट्रवादीचे बळ वाढवणारे आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी कोण यासाठी आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
७५ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या ग्रामपंचायतीचे १३ मार्च २०१६ रोजी नगरपंचायतीत रूपांतर झाले. त्यावेळी याठिकाणी राष्ट्रवादी व कॉँग्रेसची आघाडी होती. नगरपंचायत स्थापन झाली आणि काही महिन्याच्या अंतरावर नागपंचमी आली. यामुळे सर्व नागरिक, नागमंडळे, सर्व पक्षांनी जिवंत नागपूजेस जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक आयोगाला ही निवडणूक स्थगित करावी लागली. यानंतर काही महिन्यातच राजकीय घडामोडीत पक्षांतील मतभेद नागपंचमी बचाव कृती समितीत आले. ३१ डिसेंबरच्या मुख्यमंत्री दौऱ्यावेळी शिराळा बंद, बंदबाबत निवेदन यावरून तणाव निर्माण झाला. एवढेच नव्हे, तर २२ जणांना एक रात्र तुरुंगात घालवावी लागली. यामुळे निवडणूक बहिष्काराबाबत मतभेद होऊ लागले.
नागपंचमीबाबत कोणी काय केले, याबाबत टीकाटिपणी सभेत होऊ लागली. ही टीका वैयक्तिक जीवनावर, खालच्या पातळीपर्यंत पोहोचली. याचाच परिणाम काही पक्षांनी पहिल्यांदा आॅनलाईन अर्ज भरला, तर कोणी ए फॉर्म दिला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी दोन तासात १४१ अर्ज दाखल झाले. यामुळे बहिष्कार मागे पडून लोकशही मार्गाने आता नागपंचमीचा प्रश्न सोडविण्याचा विचार पुढे आला.
कॉँग्रेस आघाडी झाली नाही, मात्र भाजप-महाडिक युवा शक्ती यांची युती झाली आणि प्रचार सुरू झाला. पुन्हा प्रचारात भ्रष्टाचार, वैयक्तिक पातळीपर्यंत आरोप-प्रत्यारोप, विकासकामे, नागपंचमी हे विषय आले. पत्रके वाटली गेली, यामुळे ही निवडणूक कॉँग्रेस -राष्ट्रवादी- भाजप यांच्या अस्तित्वाची ठरली आणि सर्वजण लढाईसाठी रिंगणात आले. डिजिटल, टीव्हीद्वारे हायटेक प्रचार यंत्रणा वापरण्यात आली.
भाजपने मंत्री सदाभाऊ खोत, सौ. नीता केळकर यांच्या सभा घेतल्या, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या प्रमुख सभा झाल्या. अगदी शेवटपर्यंत मोठी चुरस चालू होती. याचमुळे विक्रमी असे ८७.५१ टक्के मतदान केले. हे विक्रमी मतदान कोणाला तारणार नी कोणाला मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
अखेर राष्ट्रवादीने १७ पैकी ११ जणांवर यश मिळविले, तर भाजपने ६ जागा मिळविल्या, मात्र कॉँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही. तसेच मतांचा विचार करता त्यातही त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीमार्फत विराज नाईक, अॅड. भगतसिंग नाईक, सौ. सुनीता नाईक, भाजपचे रणधीर नाईक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील, तर कॉँग्रेसमार्फत महादेव कदम, प्रतापराव यादव, तर महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक, केदार नलवडे यांनी प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली होती.
पहिल्या नगराध्यक्षांकडे लक्ष
राष्ट्रवादीची सत्ता नगरपंचायतीवर आली आहे. त्याचबरोबर या नगरपंचायतीमुळे प्रामुख्याने कार्यालय इमारत, घनकचरा व्यवस्था, शहरात स्वच्छतागृह उभारावे, तोरणा ओढा स्वच्छता याचबरोबर प्रामुख्याने नगरपंचायतीस गतवैभव मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागणार आहे. भाजपनेही याबाबत सत्ताधारी राष्ट्रवादीबरोबर विकास कामे आणि नागपंचमीबाबत सहकार्य धोरण जाहीर केले आहे. आता मिशन नगराध्यक्षपद यासाठी अर्चना शेटे, सुनंदा सोनटक्के आणि सुजाता इंगवले यापैकी कोण होणार पहिल्या नगराध्यक्षा याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.