गुणवत्तेच्या जोरावरच ‘रयत’ची झेप
By admin | Published: September 17, 2016 11:12 PM2016-09-17T23:12:54+5:302016-09-17T23:59:30+5:30
पतंगराव कदम : कोल्हापुरात मैदानाच्या भूमिपूजनप्रसंगी प्रशंसोद्गार
कोल्हापूर : केवळ गुणवत्तेच्या जोरावर रयत शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली असल्याचे प्रशंसोद्गार माजी मंत्री पतंगराव कदम यांनी शनिवारी काढले. संस्थेची विविध महाविद्यालये मोठी कामगिरी करीत असून, नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये कोल्हापूरचे शाहू महाविद्यालय अग्रेसर आहे, अशा शब्दांत शाहू महाविद्यालयाचाही गौरव केला.
येथील शाहू महाविद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी आणि बॉस्केटबॉल व लॉन टेनिस मैदानाच्या भूमिपूजन समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर होते. सरोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कदम म्हणाले, सत्तर रुपये पगारावर अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करणारा शिक्षक आज तुमच्यासमोर एका देशातील ‘अ’ श्रेणीच्या अभिमत विद्यापीठाचा कुलपती म्हणून उभा आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील एका बोळात मी विद्यापीठ काढण्याचे ठरविल्यानंतर माझी टिंगलटवाळी झाली. मात्र मी मागे हटलो नाही. भारती विद्यापीठ ही रयत शिक्षण संस्थेच्या वडाची एक फांदी आहे.
ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील आणि मार्इंचे या महाविद्यालयाला जे मार्गदर्शन आहे, ते महत्त्वाचे असून, आता या ठिकाणीही उत्तम खेळाडू घडविण्यासाठी स्टेडियम बांधावे. शिक्षण संस्था त्याला मदत करेल अशी ग्वाही यावेळी कदम यांनी दिली.
प्राचार्य गणेश ठाकूर म्हणाले, ‘रयत’च्या १४ महाविद्यालयांना ‘नॅक’ने ‘अ’ मानांकन दिले असून, आणखी सहा महाविद्यालये आम्हांला अपेक्षित आहेत, ज्यांमध्ये कोल्हापूरच्या ‘शाहू’चा समावेश आहे.
यावेळी सेवानिवृत्तीबाबत प्रा. मदनलाल शर्मा यांचा कदम यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. ‘शाहू कॉलेज वार्ता’ अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.
प्रा. ए. आर. तेली, प्रा. राजेंद्र
देठे, कोणार्क शर्मा यांनी मनोगत
व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, माधवराव मोहिते उपस्थित होते. प्रा. डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार यांनी आभार मानले.