निवडीमागे राज‘कारण’
By admin | Published: September 22, 2014 01:11 AM2014-09-22T01:11:45+5:302014-09-22T01:11:57+5:30
विधानसभेसाठी मारला ‘तीर ’ : ‘पी.एन-सतेज’ यांचा मतदारसंघ सुरक्षित राखण्याचा प्रयत्न
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे. या दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून आपापल्या मतदारसंघांत पदे वाटून घेऊन निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण एकाच तालुक्यात दोन महत्त्वाची पदे घेतल्याने इतर तालुक्यांतील सदस्यांसह नेते नाराज होत आहेत.
अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस, ‘स्वाभिमानी’ यांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली. पहिल्या अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद खुले असल्याने अमल महाडिक, संजय मंडलिक यांनी जोरदार तयारी केली होती. महाडिक यांना डावलून मंडलिक यांना संधी देण्यात आली. त्यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला संधी मिळालेली नव्हती. मंडलिक यांच्या राजीनाम्यानंतरच्या अध्यक्ष निवडीत सतेज पाटील यांनी उमेश आपटे यांच्यासाठी आग्रह धरला, तर पी. एन. पाटील यांनी अमल महाडिक यांना दिलेल्या ‘शब्दा’नुसार त्यांना संधी द्यावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले येथे आपटे यांनी बाजी मारली.
आगामी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले होते. यासाठी या गटातून प्रमोदिनी जाधव, भाग्यश्री गायकवाड व ज्योती पाटील तर इतर मागासवर्गीय गटातून विमल पाटील व प्रिया वरेकर यांनी दावा केला होता. गायकवाड या गेले अडीच वर्षे महिला व बालकल्याण सभापती असल्याने त्या स्पर्धेतून बाजूला गेल्या. गृहराज्यमंत्री पाटील हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाजूला झाले पण पी. एन. पाटील यांच्या मतदारसंघातील त्यांच्या गटाच्या सदस्या प्रिया वरेकर यांचे नाव पुढे केले होते. ज्योती पाटील या भरमूअण्णा पाटील यांची स्नुषा आहे. पाटील यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे त्यांचे नाव मागे पडल्याचे समजते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगलेमध्ये मदत होईल म्हणून जयवंतराव आवळे यांनी जाधव यांच्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पी. एन. पाटील यांनी विमल पाटील यांना संधी दिली.
उपाध्यक्षपदासाठी शशिकांत खोत यांच्यासह शहाजी पाटील यांनी फिल्डिंग लावली होती. गेल्या दोनवेळा थांबविलेले राहुल देसाई यांनाही नेते आपला शब्द पाळतील असे वाटत होते. पण देसाई यांच्या नावाचा विचारही झाला नाही. शहाजी पाटील हे आमदार ‘महाडिक समर्थक’ असल्याने त्यांच्याही नावाची फारशी चर्चा झाली नाही. एकंदरीत या निवडीवर पी. एन. पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची पकड राहिली आहे. आपापले मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठीच त्यांनी या निवडी केल्या आहेत. पंधरा दिवसांनी होणाऱ्या विषय समिती सभापती निवडी दाखवून इच्छुकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
४सत्तेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेची मदत घेण्याची तयारी केली होती. पण निवडणुकीच्या धामधूमीत दुसऱ्याच्या पायात पाय घातला तर आपणच अडचणीत येऊ, असे मत शिवसेना नेत्यांचे झाल्याने त्यांनी सावध भूमिका घेतली.
नेत्यांचे वारसदार नसल्यानेच दुर्लक्ष
४राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका व पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसबरोबर तडजोडी करते, मग जिल्हा परिषदेत का नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुले सदस्य म्हणून निवडून न आल्याने ते दुर्लक्ष करत असल्याचा उघड आरोप सदस्य करू लागले आहेत. आपल्या मुलांसाठी मुंबईतून फॉर्म्युला तयार करून आणला असता, अशी नाराजी एका इच्छुकाने बोलून दाखवली.
नऊवारी साडीतील पहिल्या अध्यक्षा
४विमल पाटील या रांगड्या सदस्या आहेत. जनावरांची उगानिगा करत त्यांचा दिनचर्या सुरू होतो. काळ्या आईची सेवा करणारी व गेले अनेक वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात काम करणाऱ्या एका लढवय्या कार्यकर्त्याच्या पत्नीला संधी मिळाल्याची प्रतिक्रिया तालुक्यातून उमटत आहे.