‘कोल्हापूर चेंबर’तर्फे राजाभाऊ शिरगावकर, राम मेनन, प्रकाश गद्रे यांचा पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:59 PM2018-10-26T14:59:31+5:302018-10-26T15:03:10+5:30
कोल्हापूर येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची (केसीसीआय) ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहातील या कार्यक्रमास चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे प्रेसिडेंट दीपेन आगरवाल प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर : किरकोळ क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणुकीचे (एफडीआय रिटेल) मोठे संकट आपल्यासमोर येऊन ठेपले आहे. त्याचा सामना करून आपला पारंपरिक व्यापार, व्यवसाय टिकविण्यासाठी देशातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी येथे केले.
येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची (केसीसीआय) ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहातील या कार्यक्रमास चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे प्रेसिडेंट दीपेन आगरवाल प्रमुख उपस्थित होते. गुरनानी आणि आगरवाल यांनी ‘व्यापार- काल, आज आणि उद्याचा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
‘शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार’ हा ज्येष्ठ उद्योगपती राजाभाऊ शिरगावकर यांच्या वतीने सचिन आणि सोहन शिरगावकर यांना, ‘परशराम ऊर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार’ हा ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन यांच्या वतीने सचिन मेनन यांना, तर ‘वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार’ हा ज्येष्ठ व्यापारी प्रकाश गद्रे यांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि रोप असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
चेअरमन गुरनानी म्हणाले, मोठी लोकसंख्या आणि विकसनशीलतेमुळे परदेशांतील रिटेल व्यापाऱ्यांची भारतातील बाजारपेठेवर नजर आहे. त्यामुळे ‘एफडीआय रिटेल’च्या माध्यमातून असे व्यापारी आपल्या देशात येण्याचा प्रयत्न करीत आहे. एफडीआय रिटेलमुळे आपला व्यापार धोक्यात येणार आहे. आपला पारंपरिक, नवा व्यापार टिकविण्यासाठी एफडीआय रिटेलला देशबाहेरच ठेवण्यासाठी एकजुटीद्वारे लढा देणे आवश्यक आहे.
केंद्र सरकारने एफडीआय रिटेलच्या निर्णयाबाबत फेरविचार करणे आवश्यक आहे. प्रेसिडेंट आगरवाल म्हणाले, पूर्वीचा व्यापार हा नैतिकता, व्यावहारिकतेवर अवलंबून होता. आज व्यापारात संभ्रमावस्था आहे. भविष्यातील व्यापार आधुनिक पद्धतीचा असणार आहे. तंत्रज्ञान आत्मसात करून वेळेनुसार व्यापारात बदल करणे आवश्यक आहे. एफडीआय रिटेल कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशात, राज्यात येणार नाही, यासाठी संघटितपणे आपण कार्यरत राहणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमात सचिन शिरगावकर, सचिन मेनन, सुबोध गद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘केसीसीआय’चे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, चंद्रकांत जाधव, मानद सचिव जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, संजय पाटील, उद्योजक दिलीप मोहिते, एम. बी. शेख, सुरेंद्र जैन, आदी उपस्थित होते. ‘केसीसीआय’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले.
माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आनंद माने यांनी मानपत्राचे वाचन केले. ललित गांधी यांनी पुरस्कारांची माहिती दिली. राजकुमार चौगुले, पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार हरिभाई पटेल यांनी आभार मानले.
या सभासदांचा सत्कार
उल्लेखनीय कामगिरी, विविध पदांवर निवड झाल्याबद्दल ‘केसीसीआय’च्या सभासदांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शशिताई देसाई, व्ही. बी. पाटील, ललित गांधी, मदन पाटील, अश्विनी दानीगोंड, सुरेश रोटे, राजीव परीख, भरत ओसवाल, संजय पाटील, नयन प्रसादे, सीमा जोशी यांचा समावेश होता.