राजापुरी,लोणच्या आंब्यासह फणसाला मागणी
By Admin | Published: April 23, 2017 06:21 PM2017-04-23T18:21:00+5:302017-04-23T18:21:00+5:30
काकडी ,गाजर,पोकळा वाढला ; हरभरा डाळ वाढली
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २३ : राजापुरी, राघु आंब्यासह लोणचेचे कैरी आंबे आणि करवंदे, जांभूळ या रानमेव्याबरोबर फणसांचे ढिगच बाजारात आले आहेत.त्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली. दुसरीकडे, या आठवड्यात भाज्यांचे दर कमी-अधिक प्रमाणात होते. मात्र, कडक उन्हाळ्याचा परिणाम बाजारपेठेवर झाल्याचे दिसून येते. दूपारच्या वेळेत ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवली होती. त्यामुळे बाजार ओस पडल्याचे चित्र होते.
शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ मार्केट या बाजारासह राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट या बाजारात आठवडी बाजारामध्ये सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. पण, दुपारी १२ नंतर उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने बाजारात गर्दी कमी होत गेली. साधारणत : दूपारी चारनंतर ग्राहकांची वाढण्यास पुन्हा सुरु झाली. रात्री सातपर्यंत खरेदीसाठी तुडूंब गर्दी होती.
लोणच्या आंब्यासह (क ैरी), गुळ आंब्याचा आंबा (राजापुरी), राघु आंब्यांला मागणी होती. राजापुरी शंभर रुपयाला तीन व चार नग तर लोणच्याचे आंबे ४० रुपयांपासून ते ५० रुपयांच्या घरात होते. राघु आंबा दहा रुपयाला एक तर २० रुपयाला तीन असे होते. त्याचबरोबर पावशेर करवंदे २० रुपये, जांभळे ४० रुपयांसह तर कापा फणस ८० रुपयांपासून ते शंभर रुपयांच्या जवळपास होता.
फणसाच्या गराचा पावशेरचा दर २० ते २५ रुपये असा होता. दुसरीकडे, वांगी, कोबी, भेंडी, मेथी, ढबु मिरची , गाजर, फ्लॉवर, कोथिंबीर, पोकळ्याच्या दरात वाढ झाली आहे तर टोमॅटो, ओली मिरची, दर स्थिर आहेत. काकडीचा दर दहा किलोचा दर १०५ रुपयांवरुन तो ७० रुपयांवर आला होता. विशेषत : उन्हाळ्यात काकडी घेण्याऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असते. त्यामुळे दर उतरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
पोकळ्यात तब्बल दहा किलोला १५० रुपयांनी वाढ होऊन तो ४०० रुपये आला आहे. कोथिंबीरमध्ये शेकडा (पेंढी) दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. ती ९५० रुपये झाली आहे. दरम्यान, हरभरा डाळीमध्ये प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ होऊन ८४ रुपये झाली आहे तर काजू ८०० रुपयांवरुन तो ८५० रुपये झाला आहे. सर्वप्रकारच्या तांदूळाचे दर जैसे थे होते.
आंब्याचे दर स्थिर...
गेल्या आठवड्यात असणारे हापुस, रायवळ, मद्रास हापूस व मद्रास पायरीचे दर जसे होते.हेच दर या आठवड्यात होते.
डझनाला ३० रुपये...
लोणच्याचे आंबे कापून देण्यासाठी डझनाला ३० रुपये असा दर आहे.त्यासाठी दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये ग्राहकांची गर्दी असते.
आंबा हा दावणगिरी येथून आणला जातो. मार्गशीर्ष महिन्यापासून ते आषाढी महिन्यापर्यंत आंब्याला मागणी असते. सर्व प्रकारचे ग्राहक आंबा खरेदीसाठी येतात.
-मारुती लहू केसरकर,
आंबा विक्रेते, कपिलतीर्थ मार्केट, कोल्हापूर.