राजापूरचा हायड्रोलिक बंधारा कागदावरच
By admin | Published: December 25, 2014 12:24 AM2014-12-25T00:24:29+5:302014-12-25T00:26:11+5:30
लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज : ‘शासकीय काम, सहा महिने थांब’चा अनुभव
संदीप बावचे- शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याला पर्याय देण्यासाठी कर्नाटकातील हिप्परगी धरणाचा पॅटर्न वापरून हायड्रोलिक (स्वयंचलित) पद्धतीचा बंधारा उभारण्यात येणार आहे. हायड्रोलिक पद्धतीच्या बंधाऱ्याचे डिझाईन (रेखाचित्र) करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नाशिक येथील कंपनीकडे आराखडा पाठविण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षे उलटली, तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
तालुक्यातील २२ गावांना गेल्या ३४ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बहुतांशी दगड निखळून गेल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ऐन उन्हाळ्यात पाणी गळतीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. बंधाऱ्याची तात्पूर्ती दुरुस्ती होत असली तरी ३४ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या असलेला बंधारा कोल्हापूर पद्धतीचा आहे. ही संकल्पना आता कालबाह्य झाल्याने आधुनिक यांत्रिकी (हायड्रोलिक) पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. डिझाईन मंजुरीनंतर या बंधाऱ्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, हे समजणार होते. त्यानंतर असा बंधारा उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार होता.
तत्कालीन आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या मागणीनुसार राजापूर बंधाऱ्याला पर्याय म्हणून हायड्रोलिक पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून हालचाली झाल्या होत्या. दरम्यान, नाशिक येथील कंपनीकडून राज्यातील बंधाऱ्यांची रेखाचित्रे (डिझाईन) तयार केली जातात. राजापूर बंधाऱ्याचेही रेखाचित्र तयार करण्यासाठी माहिती पुरविण्यात आली आहे. पुन्हा स्मरणपत्र देणार असल्याची माहिती पाठबंधारे विभागाचे वायचळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिरोळ तालुक्यासाठी राजापूर बंधारा महत्त्वाचा असून, या बंधाऱ्यामुळे २२ गावांतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटतो. पाठबंधारे विभागाकडून बंधाराच्या नूतनीकरणासाठी संथ गतीने हालचाली सुरू असल्या, तरी आपण या प्रश्नी लक्ष घालून पाठपुरावा करू.
- आमदार उल्हास पाटील