दमदार पावसाने राजाराम बंधारा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 01:04 PM2020-06-17T13:04:56+5:302020-06-17T13:11:59+5:30
दमदार पावसाने काल राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधारा काल सायंकाळी चारच्या सुमारास पाण्याखाली गेला. सध्या बंधाऱ्याजवळ १८ फूट इतकी पाणीपातळी झाली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावर होणारी बावडा - वडणगे वाहतूक आता ठप्प झाली आहे.
पुराच्या पाण्याचा बंधाऱ्याला धोका पोहोचू नये म्हणून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंधाऱ्याच्या प्लेटा काढून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे बंधाऱ्याजवळची पाणी पातळी सहा फूट इतकी खाली गेली होती. मात्र राधानगरी, तुळशी आणि कुंभी जलाशयामधून पाणी सोडल्यामुळे अवघ्या दोन दिवसात पाणीपातळीत वाढ होऊन ती पुन्हा दहा फुटांपर्यंत गेली. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढ झाली आणि बंधारा पाण्याखाली गेला. सध्या बंधाऱ्याजवळ १८ फूट इतकी पाणी पातळी आहे.
दरम्यान बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून औद्योगिक वसाहतीकडे कामासाठी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आता लांबचा पल्ला टाकून यावे लागणार आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने तो पाहण्यासाठी बंधाऱ्यावर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.