राजाराम कारखाना निवडणूक: आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचा, शक्तिप्रदर्शनाने सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:50 AM2023-03-28T11:50:03+5:302023-03-28T11:50:29+5:30
कोल्हापूरच्या बारा हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना होईल
कसबा बावडा : आमचं ठरलंय ‘आता कंडका पाडायचाच’ अशा घोषणा देत सोमवारी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील गटाच्या राजर्षी शाहू परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यावेळी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सासणे ग्राउंड येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीद्वारे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.
यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, गेली २८ वर्षं हा कारखाना महाडिक यांच्या ताब्यात आहे. पण इतर कारखान्यांच्या तुलनेत दोनशे रुपये प्रतिटन दर कमी देण्याचे पाप येथे केले जातेय. बेडकिहाळला सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, डिस्टलरी प्रकल्प झालेत. मग राजाराममध्ये असे प्रकल्प का झाले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. आम्ही सातत्याने यासाठीच लढा देतोय.
कोणताही प्रकल्प न करता सभासदांवर फक्त अन्याय केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या विषयाचा एकदा कंडका पडला पाहिजे अशी सभासदांची भूमिका आहे. पाटील म्हणाले, मागच्या वेळी बाहेरगावचे सभासद होते. तरी आमचे पॅनल अवघ्या शंभर मतांनी मागे राहिले. आता तर लोकांमधूनच उद्रेक आहे.
गेली २८ वर्षे कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. आता पाच वर्षे आमच्याकडे द्यावा. कोल्हापूरच्या बारा हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना होईल. तो बाहेरच्या सहाशे लोकांच्या ताब्यात देऊ नये. मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे वर्ग केले जातील, अशी ग्वाहीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, विजयमाला विश्वास नेजदार, शशिकांत खवरे, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, अजित पाटील, अभिजित भंडारी, राजकुमार पाटील, उत्तम सावंत, दिलीप पाटील (टोप), बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती हिंदूराव ठोंबरे, बाबासो माळी, विजय पाटील, बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.