Kolhapur- राजाराम कारखान्याच्या सत्तासंघर्षाला धार, सोशल मीडियावर जोरदार वॉर
By राजाराम लोंढे | Published: April 8, 2023 01:37 PM2023-04-08T13:37:03+5:302023-04-08T13:56:54+5:30
विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले
राजाराम लोंढे
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून व्यक्तिगत टीका-टिप्पणीबरोबरच कारभारावर आसूड ओढले जात आहेत. प्रचार सभेतील खडाखडीबरोबरच आता, सोशल मीडियातील वॉर जोरदार सुरू झाले असून माघारीनंतर संघर्ष टोकाला पोहोचणार, हे निश्चित आहे.
‘राजाराम’ कारखान्याचा सत्तासंघर्षाला धार येत आहे. त्यात छाननीनंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर शब्दरूपी अस्त्रे सोडली जात आहेत. शह-काटशहाचे राजकारणाला उकळी येण्यास सुरुवात झाली असून, सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार अमल महाडिक व विरोधी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील हे कार्यक्षेत्रातील गाव अन् गाव पिंजून काढत आहेत. प्रचार सभेतून एकमेकांवर वार सुरू असतानाच सोशल मीडियातूनही दोन्हीकडून जोरदार हल्ले चढवले जात आहेत.
विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले आहे. यासह सोशल मीडियातून वेगवेगळे एकमेकांना उघडे पाडण्याचा प्रकार सुरू आहे. आगामी काळात तो वाढत जाणार आहे.
जमीन सुपीक मग रिकव्हरी कमी कशी?
दोन शेतकरी शेतात गप्पा मारत असताना, आमची जमीन सुपीक मग ‘राजाराम’ची रिकव्हरी कमी कशी? अरे, रिकव्हरी मारत्यात, दुसर काय. चांगल्या रिकव्हरीसाठी आता ठरलंय बघ कंडकाच पाडायचा.
काट्यात फरक दाखवा, दोन लाख बक्षीस मिळवा
प्रचार सभेतून विरोधकांनी कारखान्याच्या वजन काट्यावरच प्रश्न उपस्थित केला. त्याला ‘राजाराम’च्या काट्यात फरक दाखवा, दोन लाख बक्षीस मिळवा, असे आव्हानच सत्तारुढ आघाडीने सोशल मीडियातून दिले आहे.
अरं ते तर येलूरचा ऊस नेणार
‘टोळी कुठं चाललीय?,’ असा प्रश्न एक शेतकरी विचारतो, दुसरा शेतकरी म्हणतो, अरे कुठला म्हणजे स्वत:च्या रानातील ऊस तोडायला. म्हणजे ‘राजाराम’ कारखाना ऊस नेत नाही व्हय. त्यावर, अरं ते आमचा ऊस नेणार नाहीत, येलूरचा अगोदर तोडणार, असा टोला विराेधकांनी लगावला आहे.
विरोधकांचे शक्तिप्रदर्शन..सप्पय गंडलंय
उमेदवारी अर्ज दाखल करताना विरोधी आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना मीडियाच्या प्रतिनिधींना आपण सभासद आहात का? असे विचारले असता, नाही म्हणणाऱ्यांची संख्या दाखवत, विरोधकांचे शक्तिप्रदर्शन...सप्पय गंडलंय, असा टोला सत्तारुढ आघाडीने लगावला आहे.