राजाराम कारखाना निवडणूक: को-जनरेशनद्वारे जादा ऊस दर, रोजगारही देणार; अमल महाडिक यांचा ‘शब्द’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:45 AM2023-04-22T11:45:38+5:302023-04-22T11:46:06+5:30
महादेवराव महाडिक हे ‘शब्द’ पाळणारे नेतृत्व आहे हे कोल्हापूर जिल्हा गेली ४० वर्षे पाहत आला आहे.
कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या ज्या सभासदांनी गेली २८ वर्षे महादेवराव महाडिक यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उलट येत्या पाच वर्षांत को जनरेशन प्रकल्प राबवून उत्पादकांना जादा दर देण्याबरोबरच वाढीव रोजगारही देणार असल्याचा ‘शब्द’ माजी आमदार अमल महाडिक यांनी ‘लोकमत’च्या मुलाखतीमध्ये दिला. यापुढच्या काळात आधुनिकीकरणाच्या माध्यमातून १२२ गावांमधील शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देणार असल्याचे सांगत त्यांनी त्याचा आराखडाच मांडला.
ते म्हणाले, विरोधकांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे आम्ही जाहीरपणे दिली. परंतु आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी अजूनही दिलेली नाहीत. १२२ गावांतील सभासद शेतकऱ्यांचा हा कारखाना केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी त्यांना कसबा बावड्यापुरताच करायचा आहे पण हे कदापिही होऊ देणार नाही.
प्रश्न : विरोधकांचे अर्ज अपात्र झाले. परंतु तुमच्यावर का आरोप होत आहेत?
उत्तर : विरोधकांचे अर्ज आम्ही अपात्र करण्याचा प्रश्नच नाही. प्रशासकीय यंत्रणेने कारखान्याच्या पोटनियमांनुसार अर्ज अपात्र ठरवले. त्याही पुढे जावून उच्च न्यायालयाने त्यांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब केले. न्यायदेवतेसमोर सर्वजण समान आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना काहीही अर्थ उरत नाही.
प्रश्न : कारखान्याच्या विस्तारीकरणाला विलंब का झाला ?
उत्तर : मुळात हा कारखाना शहरी भागात आहे. नदीपासून हाकेच्या अंतरावर आहे. यासाठी काही पर्यावरणाच्या अटी आहेत का किंवा एकूणच कारखान्याच्या आणि सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून आणि सगळ्यात महत्त्वाचे सभासदांना विश्वासात घेऊन याबाबत निर्णय घेण्याची गरज होती तसा सर्वसाधारण सभेत विषय मांडून २०१८/१९ साली को-जनरेशनसाठी आम्ही ठराव केला. त्यासाठी शासनाची परवानगी घेतली आहे. कोरोनामुळे हे काम सुरू करता आले नाही. कोरोनाची लाट आली नसती तर आतापर्यंत को- जनरेशन प्रकल्प पूर्णही झाला असता.
प्रश्न : तुम्ही दरात नुकसान करताय असा आरोप होतोय?
उत्तर : पूरग्रस्त आणि अतिवृष्टीच्या परिसरातील गावांचा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. हा सर्व ऊस सरसकट उचलला जातो तसेच सध्याची कारखान्याची यंत्रणा जुनी आहे. त्यावरच आवश्यक दुरूस्ती करत २२०० टनांपासून ३५०० टनांपर्यंत कारखान्याची क्षमता वाढविण्यात आली. आता कारखान्याची मशिनरीही बदलावी लागणार आहे. ५ हजार टनाची क्षमता केल्यानंतर निश्चितच मोठ्या कारखान्यांप्रमाणे दर देण्यास आम्ही बांधील आहोत.
शेतकऱ्यांना त्रास न होता ऊसतोड
एकतर कोणत्याही कारखान्याकडे नसेल एवढे मोठे कार्यक्षेत्र छत्रपती राजाराम कारखान्याचे आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील अनेक गावे आहेत; परंतु अशाही भागातील सर्वच्या सर्व ऊस आपण तोड करतो. त्यामध्ये कुठेही शेतकऱ्याला त्रास न होता ही तोड दिली जात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्याचा आमच्यावर विश्वास आहे.
निवडणूक लादली
सतेज पाटील हे ‘शब्द’ पाळणारे नाहीत याचा अनुभव आम्ही गेली अनेक वर्षे घेत आलो आहोत. त्यावर आमदार विनय कोरे यांनी दोनच दिवसांपूर्वी कुंभोजच्या जाहीर सभेत शिक्कामोर्तब केले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी केवळ आणि केवळ भाजप पक्षाचा आदेश म्हणून आम्ही थांबलो. परंतु त्यासाठी आम्ही कोणत्याही अटी घातल्या नव्हत्या. वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली परंतु तो ‘शब्द’ त्यांनी पाळला नाही. महादेवराव महाडिक हे ‘शब्द’ पाळणारे नेतृत्व आहे हे कोल्हापूर जिल्हा गेली ४० वर्षे पाहत आला आहे.
राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय आधीच
छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय आधीच झाला आहे. फक्त विस्तारीकरणावेळी जागेच्या काही अडचणी येऊ नयेत म्हणून अजून पुतळा उभारलेला नाही. जेव्हा विस्तारीकरण आणि को- जनरेशनच्या जागेचा निर्णय होईल तेव्हा पुतळ्याची जागा निश्चित करून तो उभारला जाणार आहे.
मग इतकी वर्षे आमच्यावर विश्वास का?
गेली २८ वर्षे महादेवराव महाडिक यांच्यावर सभासदांनी विश्वास ठेवला कारण आम्ही डी. वाय. पाटील कारखान्यासारखे एका रात्रीत सभासदांना काढून टाकले नाही. सभासदांविषयी आत्मीयता असल्यानेच कारखान्याची सत्ता आमच्याकडे राहिली.
हे आम्ही आधीच केले आहे
- कामगारांचा विमा, पीएफ, प्रमोशन सर्व काही सुरळीतपणे सुरू आहे.
- माती परीक्षणाचे कामही सुरू असते.
- नवी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.
- प्रशासकीय इमारतीचे काम लवकर पूर्ण होणार आहे.
- ऊस उतरला की संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर राजाराम ॲपच्या माध्यमातून मेसेज जातो.
- पाणंद विकास योजनेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये काम झाले आहे.