Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला झटका, २९ उमेदवारांचे अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:42 AM2023-03-30T11:42:53+5:302023-03-30T11:43:16+5:30
अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक
कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक छाननीत २३७ अर्जांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज अपात्र (बाद ) तर १५० अर्ज पात्र ठरले. कारखान्याशी ऊस पुरवठ्याबाबत केलेल्या कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत विरोधी आघाडीचे कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, मारुतराव मेडशिंगे यांच्यासह २९ जणांचे अर्ज अपात्र ठरविल्याने त्यांना रिंगणाबाहेर रहावे लागणार आहे. या निर्णयानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर विरोधी आघाडीच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देत निवडणूक यंत्रणेचा निषेध केला.
‘राजाराम’ कारखान्याच्या २१ जागांसाठी विविध गटातून २३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी या अर्जांची छाननी झाल्यानंतर यामधील ४१ अर्ज अपात्र ठरवण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवठा करण्याबाबत शेतकरी करार करतात, त्या करारानुसार ऊस पुरवठा केला नाहीतर कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही, असा ‘ राजाराम ’ चा पोटनियम आहे. त्याचा आधार घेऊन हे अर्ज अपात्र ठरवले आहेत. मंगळवारी अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक झाली होती.
बुधवारी सकाळी दहा पासूनच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बाहेर एकत्र येत निकालाची प्रतीक्षा करत होते. हरकती घेतलेले विरोधी आघाडीचे उमेदवार अपात्र ठरल्याचे समजात संतप्त सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. ‘ दबावाखाली येऊन निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो ’, ‘ दम असेल तर मैदानात उतरा ’ अशा घोषणा देण्यात आल्या. सभासद आक्रमक झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
सर्जेराव माने म्हणाले, सत्तारुढ आघाडीच्या राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आजचा निर्णय लोकशाही मारक आहे, ‘ राजाराम ’ चे सभासद सूज्ञ असून मतदानातून सत्ताधारी आघाडीला ते उत्तर देतील. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
मोहन सालपे म्हणाले, सत्तारुढ आघाडीचा हा रडीचा डाव आहे. २८ वर्षाचा कारभार पारदर्शक आहे, तर घाबरता का ? रिंगणात या.
अपात्र ठरलेले उमेदवार असे :
गट क्र.१ - बाबूराव बेनाडे, पांडुरंग जाधव
गट क्र.२- सर्जेराव माने, दिगंबर पोळ, उत्तम सावंत, मधुकर खोत, अजितकुमार पाटील, अमित भंडारी, संदीप भंडारी, बाळासाहेब माने, नागनाथ भोसले, लालासो कोळी.
गट क्र.३- बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, नामदेव शिंदे, सुरेश पाटील.
गट क्रमांक ४- महादेव पाटील, गणपती यादव, राजकुमार पाटील , अशोक पाटील, रंजना पाटील, सखाराम गौड, शिवाजी पाटील.
गट क्रमांक ५- जयसिंग पोवार
गट क्रमांक ६- रामचंद्र नलवडे, प्रकाश खराडे, रघुनाथ चव्हाण, सुधाकर साळोखे, बाबूराव चौगले, चंद्रकांत चौगले, शिवाजी पाटील, मारुतराव मेडशिंगे, मारुती मगदूम, दत्तात्रय पाटील, अजित पाटील, बाजीराव चौगले, गणपती पाटील, दीपसिंह नवले, बबन पाटील.
महिला राखीव - रंजना पाटील
इतर मागास प्रवर्ग - नामदेव पाटील.
सत्तारुढ गटाच्या व्यूहरचनेला यश
विरोधी आघाडीची तयारी पाहता, त्यांच्याकडील ताकदवान उमेदवारांना छाननीत रोखण्याची व्यूहरचना सत्तारुढ आघाडीने अगोदरच आखली होती. त्यात ते यशस्वी झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
महापूराने ऊस गेला मग काय करायचे?
कारखान्याकडे ऊस क्षेत्राची नोंद दिली पण महापूरासह इतर नैसर्गिक कारणाने उसाचे उत्पादन घटले मग करारानुसार ऊस पाठवायचा कसा ? असा सवाल यावेळी सभासदांनी केला.
गडमुडशिंगीतील विरोधी गटाचे सर्व अर्ज बाद
गडमुडशिंगी गावात तब्बल ४४३ मतदान आहे. येथून विरोधी आघाडीकडून डॉ. अशोक पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतर दोघांचे असे चारही अर्ज अपात्र ठरले आहेत.