राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 02:58 PM2023-04-21T14:58:46+5:302023-04-21T15:11:42+5:30

महादेवराव महाडिक यांच्याकडे या कारखान्याची एकहाती २८ वर्षे सत्ता आहे परंतु त्यांनी फक्त सत्तेसाठीच कारखान्याचा वापर केला. कारखान्याचा काडीमात्र विकास त्यांनी केला नाही. कारण या कारखान्यांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता नाही

Rajaram factory election: We will manage the Rajaram factory in a way that makes us proud, says MLA Satej Patil | राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

googlenewsNext

कोल्हापूर : कारखान्याला आलेले सध्याचे बकाल स्वरूप बदलून सगळ्यांना अभिमान वाटेल असा कारभार आम्ही करून दाखवू म्हणून छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सूज्ञ सभासदांनी आम्हाला सत्तेची संधी द्यावी असे आवाहन विरोधी आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केले. या मुलाखतीत त्यांनी कारखान्याच्या विकासाची पंचसूत्रीच मांडली.

निवडणुकीत महाडिक कंपनी माझ्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू लागली आहे, परंतु मला त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही. राजाराम कारखान्याचा कारभार या एकाच मुद्यावर ही निवडणूक व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंंधितच प्रश्न घेऊन आम्ही लोकांसमोर जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्न : तुमच्या पॅनलचे तगडे उमेदवार अपात्र ठरले त्याचा काय परिणाम होईल..?
उत्तर
: आमचे २१ उमेदवारांचे तगडे पॅनल झाले आहे. सत्ताधाऱ्यांना आमच्या उमेदवारांची धास्ती होती म्हणूनच त्यांनी आमचे अर्ज अपात्र ठरवले. निवडणुकीआधीच त्यांनी पराभूत मानसिकतेतून हे अर्ज बाद केले आहेत. त्याबद्दल लोकांच्या मनांत चीड आहे. ती मतपेटीतून व्यक्त होईल.

प्रश्न : तुम्ही कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरला आहात..?
उत्तर
: इतर कारखान्याच्या तुलनेत टनाला किमान २०० रुपये कमी मिळणारा दर, उतारा कमी, ऊस विकास कार्यक्रमाकडे केलेले दुर्लक्ष, शेतकरी, सभासद, कामगार व संचालकांनाही मिळणारी अपमानास्पद वागणूक हे प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत गेलो आहोत. महाडिक यांच्याकडे दूरदृष्टी नसल्याने त्यांनी कारखान्याचा कोणताही विकास केला नाही. हातकणंगले तालुक्यात वारणा कारखान्याने उपसा जलसिंचन योजना केल्या परंतु राजाराम कारखान्याला ते जमले नाही. खांडसरी चालवल्याप्रमाणे त्यांनी कारखाना चालवला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे एकही बक्षीस या कारखान्याला कधीही मिळाले नाही यावरूनच त्यांच्या कारभाराची प्रचिती येते.

प्रश्न : राजाराम शेअर्सची साखर देतो हा फायदा नव्हे का अशी विचारणा सत्तारूढ करतात त्याचे काय..?
उत्तर
: कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखाने चांगला दर देऊनही सभासदांना साखर देतात हे लक्षात घ्यावे. त्यामुळे त्यासाठी फुकट पाठ थोपटून घेण्याची गरज नाही. साखरही द्याच परंतु दरही चांगला का दिला नाही याचे उत्तर सभासदांना द्या. लहान मुलाला चॉकलेट देऊन त्याच्या हातातील पाकीट काढून घेण्याचा हा प्रकार आहे हे न समजण्याइतके सभासद दूधखुळे नाहीत.

प्रश्न : विस्तारीकरणास आपणच विरोध केला असे सत्तारूढ गटाचे म्हणणे आहे..?
उत्तर
: विस्तारीकरणाबद्दल वार्षिक सभेत प्रश्न विचारले याला विरोध म्हणत नाहीत. तुम्ही स्वत:च्या बेडकीहाळ कारखान्यात सहवीज प्रकल्प केला. डिस्टलरी केली. मग राजाराममध्ये तुमचे हात धरायला कोण आले होते..? जे तुम्हाला जमले नाही त्याची पावती आमच्या नावाने फाडण्याचा हा महाडिक यांचा प्रयत्न आहे. सूज्ञ सभासदांच्या लक्षात हा कावा आला आहे.

सत्ता आल्यावर सभासदांसाठी काय करणार..?

  • सभासदांच्या उसाला इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्याची ग्वाही.
  • सर्व सभासदांना दरमहा शेअर्सची ७ किलो साखर देणार..दिवाळीला जादा ७ किलो साखर देणार.
  • कारखान्याचे विस्तारीकरण करणार. सहवीज प्रकल्प, डिस्टलरीची उभारणी करणार.
  • ऊस विकासाचा कालबद्ध कार्यक्रम राबविणार. जिल्ह्याचे सरासरी ऊस उत्पादन हेक्टरी ९७ टन आहे. राजारामच्या कार्यक्षेत्रात हे ७८ टनांपर्यंत आहे. लागण ते ऊसतोड येईपर्यंत काय करायला हवे याचे प्रशिक्षण देऊ. प्रत्येकी २०० एकरासाठी कृषी सहायक नेमून ऊस विकासाचा कार्यक्रम चांगल्या रीतीने राबवू.
  • कारखान्यांवरच माती परीक्षणाच्या लॅबची उभारणी करणार..शेतकऱ्यांना माती परीक्षण करून देऊन खते किती व कोणती वापरायची आणि कोणत्या जमिनीला किती पाणी द्यायचे याची शास्त्रीय माहिती देऊन उसाचे उत्पादन वाढवण्यावर भर देऊ.


राजाराम महाराजांचा पुतळा उभारणार..

या कारखान्याची उभारणी कोल्हापूर संस्थानने केली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी १९३२ ला या कारखान्याची पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीचे स्मरण म्हणून त्यांचा भव्य पुतळा कारखान्यांवर उभारणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

आत्मीयता नाही..

महादेवराव महाडिक यांच्याकडे या कारखान्याची एकहाती २८ वर्षे सत्ता आहे परंतु त्यांनी फक्त सत्तेसाठीच कारखान्याचा वापर केला. कारखान्याचा काडीमात्र विकास त्यांनी केला नाही. कारण या कारखान्यांबद्दल त्यांच्या मनात आत्मीयता नाही. त्यामुळेच कारखान्याला भकास स्वरूप आले आहे. हे बदलून महाराष्ट्राच्या साखर उद्योगात नावलौकिक मिळवेल असा कारखाना करून दाखवण्याचा शब्द या निवडणुकीच्या माध्यमातून मी सभासदांना देत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

कामगारांचा विकास...

कारखान्याचे कामगार चांगले आहेत परंतु त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व्यवस्थापनाने वापर करून घेतलेला नाही. त्यांच्यासाठी नीट स्वच्छतागृहे नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कारखाना काहीही करत नाही. राज्यभरातून ऊसतोडणी कामगार येतात. त्यात महिला, लहान मुले असतात. ओल्या बाळंतिणी असतात परंतु त्यांना सुरक्षित राहण्यासाठी एखादा हॉल किंवा साधे शेडही कारखान्यांने उभारलेले नाही. आम्ही हे चित्र बदलू. कामगार असो की ऊसतोडणी मजूर त्यांच्या श्रमातून कारखान्याचा विकास होतो याची जाणीव ठेवून त्यांना चांगल्या सोयीसुविधा देऊ.

सत्तांतराचे वारे...

प्रचाराच्या निमित्ताने प्रत्येक गावात जाण्याची संधी मिळाली. सभासद स्वत:हून येऊन भेटत आहेत. बोलत आहेत. त्यांचा प्रचंड चांगला प्रतिसाद आहे. सत्तांतर करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजाराम कारखान्यात सत्तांतर होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Rajaram factory election: We will manage the Rajaram factory in a way that makes us proud, says MLA Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.