Kolhapur-राजाराम कारखाना निकाल विश्लेषण: महाडिक गटाला मिळाले सत्तेचे बळ; सतेज यांची प्रचारात हवा, मतपेटीत पराभव
By विश्वास पाटील | Published: April 26, 2023 01:21 PM2023-04-26T13:21:56+5:302023-04-26T13:55:52+5:30
कारखान्याच्या राजकारणात अजून आपणच डॉन असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दाखवून दिले
विश्वास पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सत्ता सहाव्यांदा आपल्याकडेच ठेवून कारखान्याच्या राजकारणात अजून आपणच डॉन असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दाखवून दिले. आमदार सतेज पाटील यांनी त्यांना कडवे आव्हान दिले; परंतू एकही जागा मिळवण्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी प्रचारात जोरदार हवा केली, परंतू ती हवा मतपेटीत परावर्तीत झाली नसल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.
सभासदांनी कारखान्याची सत्ता पुन्हा महाडिक यांच्याकडेच देण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणातील एकापाठोपाठ एक सत्ता सतेज पाटील यांनी महाडिक यांच्याकडून काढून घेतल्या. तशी ही त्यांच्या हातात असलेली शेवटची एकमेव सत्ता होती. ती पण काढून घेतली जाऊ नये, अशी सहानुभूती मतदारांत तयार झाली. सामान्य माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो. तो कधीच कुणाला निशस्त्र होऊ देत नाही. मुख्यत: जो ज्येष्ठ सभासद आहे, त्याला कारखाना महाडिक यांच्याकडेच राहिला पाहिजे, असे वाटत होते, तेच मतपेटीत उतरल्याने त्यांना घवघवीत यश मिळाले. सामान्य माणूस अनेकदा सत्तेचा समतोल विचारातून घडवून आणत असतो. त्याचेही प्रत्यंतर निकालात उमटल्याचे दिसते.
सतेज पाटील यांनी कारखाना देत असलेल्या कमी दराचा मुद्दा प्रचारात जोरदार वाजवला, परंतू तरीही सभासदांनी सत्तांतर घडवून आणले नाही. याचा अर्थ त्यांनी दरापेक्षा महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. हा कारखाना दर कमी देत असला, तरी बिले नियमित मिळत होती. सभासदांना नियमित साखर मिळते. कारखान्यात काटामारी होत नाही. एका सभासदाच्यादृष्टीने कारखान्याकडून यापेक्षा जास्त अपेक्षा असत नाहीत. त्यामुळे अशा काही चांगल्या गोष्टींना सभासदांनी मतदान केल्याचे दिसते.
साखर कारखाना कोणताही असो, तिथे सत्तांतर करणे हे मोठे आव्हान असते. कारण सत्तारूढ आघाडीचे संचालक गावोगावी असतात. त्यांचा लोकांशी संपर्क असतो. साखर कारखान्याच्या निवडणुकीत गावोगावच्या उमेदवारांची स्थानिक प्रतिमा, राजकीय बळ, लोकसंपर्क फारच महत्त्वाचा ठरतो. महाडिक यांनी या निवडणुकीत तब्बल १३ नवे उमेदवार दिले. त्यामुळे समतोल आणि तगडे पॅनेल देण्यात ते यशस्वी झाले.
विरोधी आघाडीकडे ज्यांच्याकडे पाहून मते द्यायला हवीत, असा ताकदीचा उमेदवार नव्हता. त्यातील काही चेहरे अत्यंत नवखे होते. सर्जेराव माने यांच्या मुलग्यास त्यांच्या स्वत:च्या गटातही सर्वात कमी मिळाली. याचाही फटका विरोधी आघाडीला बसला. जे काही मतदान झाले ते फक्त सतेज पाटील यांच्या नेतृत्वाला पाहूनच झाले.
या कारखान्याच्या निवडणुकीत अपात्र सभासदांची लढाई निर्णायक ठरली. सत्तारूढ गटाने केलेले सुमारे १९०० सभासद अगोदर अपात्र ठरले, नंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हेच सभासद पात्र ठरल्याने महाडिक गटाचा विजय तिथेच निश्चित झाला. कारण ही एकटाक मते त्यांच्याबाजूने उभा राहिली.
महाडिक गटाने दुसरी लढाई विरोधी आघाडीचे ताकदीचे उमेदवार कसे रिंगणात राहणार नाहीत, याची दक्षता घेऊन जिंकली. ज्यांनी कारखान्याकडे उसाची नोंदणी केली आहे, परंतू त्या गटातील सर्व ऊस घातला नाही, तर तो निवडणूक लढवण्यास अपात्र ठरू शकतो, असा कारखान्याचा पोटनियम आहे. त्याचा आधार घेत २९ उमेदवार ठरले. अत्यंत नियोजनबध्दपणे केलेली खेळी विरोधकांचे पॅनेल दुबळे करण्यास कारणीभूत ठरली.
राज्यात सत्तांतर झाल्याचा फायदाही सत्तारूढ गटाला झाला. न्यायालयीन दोन्ही निर्णयांत सरकारी यंत्रणेची भूमिकाच महत्त्वाची ठरते. कारण जिल्हास्तरावरील अधिकारी जे कागदावर आणतात, त्या आधारेच न्यायालय निकाल देते. त्यामुळे दोन्ही निर्णय सत्तारूढ आघाडीच्या बाजूने झाले.
गेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासोबत आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे, निवेदिता माने व राजेंद्र पाटील-यड्रावकर हे गट होते. या निवडणुकीत राज्यातील सत्तेत हे सर्वच भाजपचे सहप्रवासी असल्याने महाडिक गटासोबत राहिले. त्याचा मोठा फायदा महाडिक यांना झाला.
कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांची सोबत व गावोगावी तयार झालेले गट यामुळे या निवडणुकीत आपण हातकणंगले तालुका अगदीच एकतर्फी होणार नाही, असे सतेज पाटील यांना वाटले होते; परंतू प्रत्यक्षात तसे घडले नाही. शिरोलीने महाडिक यांना जेवढी ताकद दिली, तेवढी ताकद कसबा बावड्याने सतेज पाटील यांना दिली नाही. करवीर व राधानगरी तालुक्यानेही सतेज पाटील यांना हवे तितके पाठबळ दिले नाही.
राजकीय बळ..
या निकालाचे आगामी महापालिका, जिल्हा परिषदेच्या आणि कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीतही पडसाद उमटणार आहेत. या दोन्ही गटातील राजकीय लढाई तीव्र होणार आहे. निकालानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी शड्डू ठोकून त्याची चुणूक दाखवून दिली आहे. राज्यसभापाठोपाठ या निकालाने महाडिक गटाला मात्र नक्कीच राजकीय बळ मिळाले.
अमल यांच्यापुढील आव्हाने..
या कारखान्याची धुरा आता नवे नेतृत्व म्हणून अमल महाडिक यांच्याकडे आली आहे. कारखान्याचे विस्तारिकरण, को-जन प्रकल्प, उसाला स्पर्धात्मक दर, कामगारांचे प्रश्न अशी आव्हाने त्यांच्यापुढे आहेत. छत्रपती घराण्याने पाया घातलेल्या हा कारखाना आहे. दूरदृष्टीने त्याचा नावलौकिक त्यांनी वाढवावा, असाही या निकालाचा अर्थ आहे.