राजाराम कारखाना सहवीज प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:29 PM2017-09-28T14:29:09+5:302017-09-28T14:40:24+5:30
शासन वीज विकत घेण्याची हमी देत असल्याने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातर्फे सहवीज प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा शुगरमिल येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सहकारी सभेत गुरुवारी करण्यात आली. सभा संपल्यानंतर विरोधकांनी काही काळ गोंधळ घातला.
कोल्हापूर, दि. २८ : शासन वीज विकत घेण्याची हमी देत असल्याने छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातर्फे सहवीज प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा शुगरमिल येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सहकारी सभेत गुरुवारी करण्यात आली.
सभा संपल्यानंतर विरोधकांनी काही काळ गोंधळ घातला. विषयपत्रिकेवरील सर्व विषय तत्पूर्वीच मंजूर झाले. तासभर चाललेल्या या सर्वसाधारण सभेला विरोधकांसह सभासदांनी चांगलीच गर्दी केली होती. दरम्यान, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अहवाल आणून दिल्यास रोख बक्षिस देउ, असे आव्हान महादेवराव महाडिक यांनी दिले.
सकाळी ११ वाजता राजाराम कारखान्याच्या कार्यस्थळावर ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रारंभ झाला. या सभेत विरोधकांनी १६ प्रश्नांची यादी आधीच दिली होती. या प्रश्नांची उत्तरे देण्याचा सत्तारुढ गटाचे सदस्य प्रयत्न करत असताना विरोधक व्यत्यय आणत होते. ही सभा एक तासाहून अधिक वेळ चालली.
सभेत राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून सहवीज प्रकल्प उभारण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पातून निर्माण झालेली वीज विकत घेण्याची हमी राज्य सरकारने घेतल्यामुळे हा प्रकल्प उभारण्याच्या निर्णयावर या सभेने शिक्कामोर्तब केले.
सभेत कारखान्याचे सचिव उत्तरे वाचून दाखवित असतानाच विरोधकांनी पुढे येउन गोंधळ घातला. मंजूर... मंजूर अशा शब्दात सत्तारुढ गटाच्या सभासदांनी घोषणा देत सभा संपविण्याची मागणी केली. या गोंधळातच सभा संपविण्यात आली. सभेत कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, आमदार महादेवराव महाडिक यांनी भाषण केले.
दरम्यान, विरोधकांनी सभा संपल्यानंतर समांतर सभा घेतली. या सभेत सत्तारुढ गटाने विचारलेल्या १६ प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्याचा आरोप केला. सत्तारुढ गटाने केलेल्या कामाचे वाभाडे विरोधकांनी या सभेत काढले. कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार, अॅड. प्रल्हाद लाड, विद्यानंद जामदार हे यावेळी उपस्थित होते.
या सभेला अपेक्षेपेक्षा जास्त सभासदांनी हजेरी लावली. विरोधकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या सभेत गोंधळ होणार, या शक्यतेने पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. कारखान्याच्या बाहेरच्या बाजूला सभेला येणाºया सभासदांच्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.
डी. वाय. पाटील कारखान्याचा अहवाल द्या
आमदार महादेवराव महाडिक यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अहवाल उद्यापर्यंत आमच्या कोणत्याही संचालकांकडे आणून द्या, अहवाल आणून देणाºयास अकरा हजार रुपये रोख बक्षिस देतो, असे आव्हान यावेळी त्यांनी विरोधकांना दिले.
कारखाना महाडिकांचा नव्हे शेतकºयांचा
राजाराम सहकारी साखर कारखाना ही काही महाडिकांंची जहागिरदारी नाही, तर सर्वसामान्य शेतकºयांचा हा कारखाना आहे, याची विरोधकांनी जाणीव ठेवावी, असा टोला यावेळी आमदार महादेवराव महाडिक यांनी लगावला.