राजाराम कारखाना: सतेज पाटील यांना पराभव पचलेला नाही, अमल महाडिकांनी लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:31 PM2023-09-08T12:31:25+5:302023-09-08T12:32:23+5:30
राज्य सरकारकडे अपील करणार
कोल्हापूर : कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैरमार्गाने सभासदांवर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही. सतेज पाटील यांना राजारामचा पराभव पचलेला नाही, असा टोला कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी गुरुवारी प्रसिध्दीपत्रकातून लगावला. अपात्र ठरवलेले सभासद १२७२ नसून फक्त ८२४ असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे.
पत्रकात म्हटले आहे, सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले वक्तव्य बालिशपणाची आहेत. प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी संबंध नसताना कायदेशीर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणुकीसंंबंधी दिशाभूल करत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याचपुरता मर्यादित आहे. त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काहीतरी करून दाखवत आहे असे भासवण्याचा प्रयत्न आहे.
या निकालामध्ये मोठमोठी आकडेवारी सांगून सभासदांमध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव ते करीत आहेत. निवडणुकीत मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झाले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. खरे पाहता २१-० झालेला दारुण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही.
राज्य सरकारकडे अपील करणार
प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे आदेश दिला आहे. आदेश आणि त्यांच्याविरुध्द अवमान याचिका दाखल करणार आहे. निकालाविरोधात राज्य सरकारकडे अपील करणार आहे. प्रादेशिक सहसंचालकांचा आदेश सभासद, शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधात आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.