‘राजाराम’चे विस्तारीकरण होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:25 AM2021-02-10T04:25:24+5:302021-02-10T04:25:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : केंद्र व राज्य सरकार साखरेबरोबरच वीज, इथेनॉल, सीएनजी गॅससारख्या उपपदार्थ निर्मितीस चालना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : केंद्र व राज्य सरकार साखरेबरोबरच वीज, इथेनॉल, सीएनजी गॅससारख्या उपपदार्थ निर्मितीस चालना देत आहेत. भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सहवीज निर्मिती प्रकल्प व विस्तारीकरण करण्याचे धोरण कारखान्याचे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कारखाना विस्तारीकरण व सहवीज प्रकल्प करणारच आहे, असे पत्रक कारखान्याचे संचालक दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
राजाराम कारखान्यावर प्रचंड कर्ज असताना पुन्हा नव्याने दीडशे कोटी रुपये खर्च करून विस्तारीकरण व सहवीज प्रकल्पाचा घाट कशासाठी, असा सवाल माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी उपस्थित केला होता. या पत्रकाला उत्तर म्हणून कारखान्याच्या वतीने दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खुलासा करत मोहन सालपे यांच्यावर जोरदार टीका केली.
वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी मान्यता दिल्याप्रमाणे कारखान्यास सहवीज प्रकल्प उभारणीस व विस्तारित करण्यास शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. तसेच किफायतशीर वीज खरेदी दराबाबत शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. याबाबत साखर संघाकडून राज्य शासनाकडे जरूर तो पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे. सध्या गाळप क्षमता कमी असल्याने नोंद होणाऱ्या संपूर्ण उसाचे गाळप करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण उसाचे गाळप होण्यासाठी पाच हजार मेट्रिक टन गाळपाचे विस्तारीकरण व सहवीज प्रकल्प करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे दिलीप पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.
सध्या कारखान्यात साखरेव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे अन्य उपपदार्थ निर्माण होत नाहीत. तरीही कारखाना एफआरपीप्रमाणे दर देत आहे. भविष्यात यापेक्षा चांगला दर देता यावा, यासाठी विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार समिती चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले तत्कालीन सचिव मोहन सालपे यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. कारखान्याच्या सभासदांनी महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साथ दिली आहे, असेही दिलीप पाटील यांनी पत्रकात शेवटी नमूद केले आहे.