राजारामपुरी पोलिसांची तरुणाला अमानुष मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:39+5:302021-05-17T04:23:39+5:30
कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याची लेखी तक्रार तरुणाने विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा ...
कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याची लेखी तक्रार तरुणाने विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली. राकेश उदय रेंदाळकर (रा. शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर) असे तक्रारदाराचे नाव आहे.
रेंदाळकर याने दिलेल्या निवेदनात म्हटले की, दि. १३ मे २०२१ रोजी राजारामपुरी पोलीस ठाण्यातील महेश काळे व आणखी एकाने आपल्याला उचलून सुभाषनगर पोलीस चौकीत आणले. तेथून राजारामपुरी पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने त्यांच्याच केबिनमध्ये पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. त्यानंतर पोलीस गाडीतून उमा चित्रमंदिरनजीक तसेच गांधीनगर येथेही फिरवून पुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणले. मारहाणीमुळे अंग थरथरत होते. त्यामुळे पोलिसांनी मला घरी सोडले. आईने शेजाऱ्याच्या मदतीने मला सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दि. १४ मेला राजारामपुरी पोलिसांत तक्रारही दिली, पण कारवाई केली नाही. मारहाण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे फुटेज जप्त करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
वाच्यता केल्यास मोक्का लावू
मारहाण करून घरी सोडल्यानंतर पोलिसांनी मला, या प्रकरणाची कोठेही वाच्यता केल्यास तुला मोक्कासारख्या गुन्ह्यात अडकवणार असल्याची धमकी दिल्याचेही त्याने निवेदनात म्हटले.