Lok Sabha Election 2019 राजारामपुरीत संमिश्र वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:30 AM2019-04-15T00:30:53+5:302019-04-15T00:31:14+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये महाद्वार रोडनंतर दुसरी व्यापारी पेठ व उच्चभ्रू वसाहत म्हणजे ‘राजारामपुरी’ होय. अशा या पहिल्या ते १४ ...
कोल्हापूर : शहरामध्ये महाद्वार रोडनंतर दुसरी व्यापारी पेठ व उच्चभ्रू वसाहत म्हणजे ‘राजारामपुरी’ होय. अशा या पहिल्या ते १४ व्या गल्लीपर्यंत विस्तारलेल्या राजारामपुरीची स्थापना छत्रपती राजाराम महाराजांनी केली. १९८० ते २००४ सालापर्यंत या परिसराची ओळख स्व. दिग्विजय खानविलकर यांचा बालेकिल्ला म्हणून होती; मात्र आमदार सतेज पाटील यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर यातील अनेक महत्त्वाचे कारभारी माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पाटील यांच्याकडे विखुरले गेले; त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मानणारा गट येथे आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांची वानवा होती. यंदा मात्र याच परिसरातील सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांसह आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांची फौज मंडलिकांचा प्रचार आक्रमकपणे करीत आहेत, तर खासदार महाडिक यांच्या प्रचारात मोजकेच कारभारी अंतर्गत प्रचार करण्यात मग्न आहेत; त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांचा पत्ता लागत नाही.
राजारामपुरीचा पसारा अगदी पहिली गल्ली ते १४ वी गल्ली, सायबर चौक, माउली पुतळा परिसर, शाहूनगर, प्रतिभानगर, टाकाळा, माळी कॉलनी, काटकर माळ, आदीपर्यंत पोहोचला आहे. यात मंडलिक पार्क, एस. टी. कॉलनी, शारदा हौसिंग सोसायटी, भारत हौसिंग सोसायटी, विश्वनाथ हौसिंग सोसायटी, अशा एक ना अनेक सोसायटींमुळे ही वसाहत अपार्टमेंट संस्कृतीचा एक नमुना बनून गेली. येथे प्रभाग क्रमांक ३६ ते ४२ पर्यंतचा सहा प्रभागांचा समावेश झाला. त्यात सुमारे ४० हजारांहून अधिक मतदान या परिसरात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजपमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याची स्पर्धाच लागली आहे; त्यामुळे अक्षरश: एका उमेदवाराचे समर्थक भेटून आल्यानंतर काही वेळातच दुसऱ्या उमेदवाराचे समर्थक मतदारांच्या दारात असतात; त्यामुळे राजारामपुरीत काटोंकी टक्कर पाहण्यास मिळत आहे. दोन्ही बाजंूनी कॉर्नर सभा, प्रचारफेरी, घराघरांतून मतदान आमच्याच उमेदवाराला द्या, असे आवाहन केले जात आहे. त्यात दूरच्या नातेवाइकांची ओळखही सांगितली जात आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनाही मानणारा एक वर्ग या परिसरात आहे. त्याचा फायदा प्रा. मंडलिक यांना होईल, असा कयास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. परिसरातील सकल मराठा समाज दोन्हीकडे विखुरला आहे.
प्रभाग ३६ मध्ये नगरसेवक संदीप कवाळे (काँग्रेस), प्रभाग क्र. ३७ मध्ये नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे (शिवसेना), प्रभाग क्र. ३८ - नगरसेविका सविता भालकर (ताराराणी आघाडी), प्रभाग क्र- ३९ मध्ये मुरलीधर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ४० विलास वास्कर (ताराराणी आघाडी), प्र. ४१ भाग्यश्री शेटके (ताराराणी आघाडी) यांचा समावेश आहे.
धनंजय महाडिक यांच्या बाजूने कोण?
माजी महापौर दीपक जाधव, नगरसेवक मुरलीधर जाधव, नगरसेवक विलास वास्कर, नगरसेवक संदीप कवाळे, रहिम सनदी, जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगरसेवक काका पाटील, महादेव पाटील, नितीन पाटील, हेमंत पाटील, संध्या घोटणे, राजू पोटे, संग्राम सूर्यवंशी, पद्मावती पाटील, दीपिका जाधव, सुरेखा जाधव, भैया शेटके आहेत.
संजय मंडलिक यांच्या बाजूने कोण?
नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, माजी नगरसेवक रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, दीपक चव्हाण, भाजप जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, अंकुश निपाणीकर, विजय सूर्यवंशी, जीवन कदम आहेत.