राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 01:34 PM2022-04-25T13:34:19+5:302022-04-25T13:34:56+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता.

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj had adopted the concept of democracy in modern times | राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे

राजर्षी शाहू स्मृती जागर : शाहूंची संघर्षशील लोकशाही संकल्पना, 'ही' आहेत चार सूत्रे

googlenewsNext

-प्रा. डॉ. प्रकाश पवार, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता. हा विचार महाराष्ट्रामध्ये खूप खोलवर रुजलेला आहे. हा विचार भारताच्या कानाकोपऱ्यात पसरत आहे. प्रातिनिधिक लोकशाही, लोकशाहीतील सामाजिक न्याय, लोकशाहीतील सार्वजनिक धोरण आणि कल्याणकारी राज्य अशी उदाहरणे त्यांच्या लोकशाही संकल्पनेबद्दलची आहेत.

प्रतिनिधित्वाची संकल्पना

शाहू महाराजांना प्रतिनिधित्वाची संकल्पना मान्य होती. त्यांनी त्यांच्या राज्यसंस्थेत आणि राज्य कारभारात जवळपास सर्वच समाजाला प्रतिनिधित्व मिळेल, अशी काळजी घेतली होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व मान्य केले होते. या गोष्टीचे प्रतीक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव परिषद आहे. राज्य कारभार, प्रशासनामध्ये समतोल नेतृत्व आणि सर्वच समाजांमधील नेतृत्वाला त्यांनी सामावून घेतले होते. त्यांनी लोकशाहीला समावेशन हा नवीन अर्थ प्राप्त करून दिला.

लोकशाहीचे सार्वजनिक धोरण

लोकशाही संकल्पनेचा मुख्य आशय सार्वजनिक धोरणांमध्ये असतो. शाहू महाराजांनी कृषी औद्योगिक आणि सामाजिक आशा धोरणांचा कौशल्याने वापर करून कल्याणकारी लोकशाहीची संकल्पना विकसित केली. महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या नंतर आयडिया ऑफ इंडियाच्या संकल्पनेतील कृषी क्षेत्राचे मूलभूत घटक शाहू महाराजांच्या विचारात आणि कार्यात सुस्पष्टपणे दिसतात. शाहू महाराज हे शिवरायांचे राजकीय वारसदार. त्यामुळे शाहू महाराजांचे शिवरायांच्या बद्दलचे आकलन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. याबद्दलची काही महत्त्वाची उदाहरणे चित्तवेधक आहेत.

त्यात शाहू महाराजांनी कृषीसाठी पाणीपुरवठ्याचे धोरण निश्चित केले होते. त्यांनी त्यासाठी धरणाच्या बांधकामाचे काम सुरू केले होते. कृषीवर आधारित कृषी औद्योगिक प्रकल्प सुरू केले होते. कृषी औद्योगिक समाजाची संकल्पना त्यांच्या विचारात होती. राज्यसंस्थेचा पाठिंबा कृषी क्षेत्राला त्यांनी दिला होता. आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्था त्यांनी स्थापन केल्या. कृषी उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केला.

सामाजिक न्याय

शाहू महाराजांनी लोकशाही पद्धतीने सामाजिक न्याय प्रत्यक्ष कृतीतून उतरविला, याची महत्त्वाची उदाहरणे पुढील आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रांमध्ये शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे धोरण राबविले. महिलांसाठी शिक्षणाचा प्रकल्प सामाजिक न्याय म्हणून राबवला. वेगवेगळ्या समाजासाठी वसतिगृहे स्थापन केली. त्यांच्या लोकशाही आणि सामाजिक न्याय संकल्पनेत सामाजिक सलोखा मध्यवर्ती होता. धार्मिक सलोख्याचा पुरस्कार केला होता. शाहू महाराज हे लोकशाहीतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेत. याबरोबरच त्यांनी लोकशाही आणि भाषिक एकोपा यांचा विचार लोकशाही म्हणून विकसित केला होता. यामुळे कारवार धारवाड निपाणी बेळगाव आणि कोल्हापूर यांच्यामध्ये भाषिक सलोखा होता.

कल्याणकारी राज्य

शाहू महाराजांनी लोकशाही आणि कल्याणकारी राज्य यांचा एकत्रित मेळ घातला होता. त्यांनी कल्याणकारी राज्याचा मात्र पूर्ण ताकदीने पुरस्कार केला होता. लोकशाही आणि वैचारिक घडामोडी यांचा एकत्रित मेळ घातला. वैचारिक मतभिन्नतेला पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला. वैचारिक मतभिन्नता हे लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. या गोष्टीची भारतीय परंपरा आणि संघर्षशील लोकशाहीची संकल्पना विकसित केली.

Web Title: Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj had adopted the concept of democracy in modern times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.