Chhatrapati Shahu Maharaj: शाहूंसाठी शंभर सेकंद, व्हिडिओची सोशल मीडियावर कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:39 AM2022-05-04T11:39:14+5:302022-05-04T12:00:48+5:30
'वंदन लोकराजाला, शंभर सेकंद कृतज्ञतेचे' हा व्हिडिओ सोमवारी (दि. २) सायंकाळी प्रसारित झाला आणि अल्पावधीतच नेते, अभिनेत्यांपासून सामान्य कोल्हापूरकरांच्या हातातील मोबाईलवर या व्हिडिओची म्युझिक थीम फिरू लागली.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शंभर सेकंद स्तब्ध राहून राजर्षी शाहूंसाठी आदरांजली वाहण्याचे आवाहन करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसारित केलेल्या शंभर सेकंदाच्या व्हिडिओने मात्र सोशल मीडियावर कमाल केली आहे. यूट्यूबपासून इन्स्टाग्रामपर्यंत, फेसबुकपासून व्हॉटस्ॲपपर्यंत अल्पावधीतच हजारो लोकांपर्यंत कृतज्ञता आणि सद्भावनांनी भरलेला हा व्हिडिओ पोहोचला.
जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी (दि. ६) सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध राहून शाहूराजांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. जाहिरात क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेले कल्पक कलाकार अनंत खासबारदार आणि ऐश्वर्य मालगावे यांच्या संकल्पनेतून 'वंदन लोकराजाला, शंभर सेकंद कृतज्ञतेचे' हा व्हिडिओ सोमवारी (दि. २) सायंकाळी प्रसारित झाला आणि अल्पावधीतच नेते, अभिनेत्यांपासून सामान्य कोल्हापूरकरांच्या हातातील मोबाईलवर या व्हिडिओची म्युझिक थीम फिरू लागली.
कोल्हापुरातील दर्जेदार व्हिडिओ स्टुडिओ सांभाळणाऱ्या ऐश्वर्य मालगावे याने कागदावर नियोजन केले आणि दहा दिवसांत या व्हिडिओच्या शूटिंगचे आव्हान पेलले. न्यू पॅलेस, शाहू मिल, भवानी मंडप, शाहू पुतळा, अंबाबाई मंदिर, रेल्वे स्टेशन, चर्च, मशीद, कारखाने, मालिकांचे शूटिंग अशा ठिकाणांसोबतच शेतकरी, गवंडी, बांधकाम कामगार, चप्पल कारागीर, गृहिणी, दुकानदार, कलाकार, पोलीस अशा समाजातील सर्व स्तरांतील सामान्य माणसांचे शाहूंच्या कृतज्ञतेने ओथंबलेले चेहरे या व्हिडिओत शाहूराजांना वंदन करताना शूट करण्यात आले. प्रत्येकी दोन सेकंदाच्या प्रत्येक ठिकाणाचे शूट करताना अनेक आव्हांनाना ऐश्वर्यच्या टीमला सामोरे जावे लागले.
माेजक्याच दहा कलाकारांशिवाय जवळजवळ सर्व चेहरे सामान्य व्यक्तींचे शूट करण्यात आले. त्यांना विनंती करताच त्यांनी आनंदाने शूटिंगला परवानगी दिली. सकाळी आणि सायंकाळी बाह्यचित्रीकरण आणि रात्री स्टुडिओतील काम पूर्ण केले. सात प्रकारचे पोर्टेबल कॅमेरे तसेच ड्रोनचा वापर करून दहा कलाकार आणि सर्व तंत्रज्ञ झपाटल्यासारखे काम करीत होते. संगीत ऐश्वर्य मालगावे, कोरससाठी देवयानी जोशी, वैष्णवी शानभाग, बासरीसाठी सचिन शानभाग, कॅमेऱ्यासाठी हरीश कुलकर्णी, विक्रम पाटील, संकलनासाठी शेखर गुरव, लोकेशनसाठी दादू संकपाळ, रंगसंगती आणि ड्रोनसाठी अमन सिन्हा यांनी काम केले.
दाभोळकर कॉर्नर दहा सेकंद केला स्तब्ध
या व्हिडिओच्या माध्यमातून जेथे आहे तेथे स्तब्ध राहण्याचा संदेश देण्यासाठी सर्वांत गर्दीच्या दाभोळकर कॉर्नरचे चार सिग्नल वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने दहा सेकंद बंद ठेवण्यात आले आणि तेवढ्यात ड्रोनने ते दृश्य शूट करून हवा तो परिणाम साधला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी: शाहूंसाठी शंभर सेकंद, व्हिडिओची सोशल मीडियावर कमाल #Kolhapurpic.twitter.com/um8io7ZXpV
— Lokmat (@lokmat) May 4, 2022