Kolhapur News: डॉ. अभय बंग, राणी बंग यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: June 14, 2023 06:31 PM2023-06-14T18:31:50+5:302023-06-14T18:32:17+5:30
डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी बालमृत्यू, वैद्यकीय क्षेत्रांतील समाजसेवा, दारूबंदी चळवळ, आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना जाहीर झाला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजेच २६ जून रोजी शाहू स्मारक भवनात सायंकाळी ६ वाजता छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दिमाखदार कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ. अभय बंग यांचे बालपण महात्मा गांधीच्या सेवाग्राम आश्रमात गेले असून महात्मा गांधीचे विचार, वैज्ञानिक संशोधनाची कार्यपध्दती, ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांची वैद्यकीय सेवा, आणि राष्ट्रीय ते जागतिक आरोग्य नीतीवर प्रभाव असा त्यांचा प्रवास आहे.
डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांनी बालमृत्यू, वैद्यकीय क्षेत्रांतील समाजसेवा, दारूबंदी चळवळ, आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांचे ग्रामीण आरोग्य, बाल आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य अशा विषयांवर ३८ शोधनिबंध प्रसिद्ध असून 'माझा 'साक्षात्कारी हृदयरोग', 'कोवळी पानगळ', 'सेवाग्राम ते शोधग्राम', डॉ. राणी बंग यांची 'गोईन', 'कानोसा' हे ग्रंथ प्रकाशित झालेल आहेत.
त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारचा 'पदमश्री पुरस्कार', दोन राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण', भारतीय आरोग्य विज्ञान संशोधन संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. यासह 'गोईण' पुस्तकाला साहित्य पुरस्कार, व आदिवासीचे सामाजिक आरोग्य या विषयातील संशोधनासाठी 'आदिवासी सेवक', व मुक्तीपद व्यसनमुक्ती केंद्राला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला आहे. ते भारत सरकारच्या 'आदिवासींचे आरोग्य' यावरील तज्ञ समितीचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या संतुलित विकास (डॉ. केळकर) समितीचे सदस्य, बालमृत्यू व कुपोषण विषयक समितीचे अध्यक्षपद व अमेरिकेतील राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वैद्यकीय समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.