‘राजर्षी शाहू ब्लड सेंटर’चे उद्या नवीन वास्तूत स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:12+5:302021-07-15T04:17:12+5:30
कोल्हापूर : नागाळा पार्कमधील ‘राजर्षी शाहू ब्लड सेंटर’चे उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शाहू छत्रपती ...
कोल्हापूर : नागाळा पार्कमधील ‘राजर्षी शाहू ब्लड सेंटर’चे उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत नवीन इमारतीत स्थलांतर होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील व सचिव महेंद्र परमार यांनी बुधवारी दिली.
पाटील म्हणाले, गेली पंचेचाळीस वर्षे सुरक्षित रक्तपेढी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात या संस्थेचा नावलौकिक आहे. शासनाने २००८-०९च्या दरम्यान खासगी ब्लड बँकांना परवानगी देणे सुरु केले. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर सुरु झालेल्या या रक्तपेढ्यांशी स्पर्धा न करता, या रक्तपेढीने गुणवत्ता व दर्जाबाबत तडजोड न करता सुरक्षित रक्त देणे हाच उद्देश ठेवला आहे. सध्या रोटरी समाज सेवा केंद्राने बांधलेल्या नवीन इमारतीत ब्लड बँकेला ४००० चौरस फुटाची प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्राने सुरक्षित रक्त देण्याचे या रक्तपेढीचे उद्दिष्ट राहील. यात नॅट या चाचणी प्रणालीचा वापर करून आणखी सुरक्षित रक्त देण्याचा संकल्प आहे. महिन्याला दहा बाटल्या रक्तसंकलन स्थापनेवेळी होती. आज महिन्याला ६००हून अधिक रक्त संकलन तर १,३००हून अधिक रक्तदात्यांना याचा लाभ मिळत आहे. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अक्षता पवार उपस्थित होत्या.
या रक्तपेढीतून मिळणारे रक्ताचे घटक व सुविधा असे,
- पी. सी. व्ही. - ॲनिमिया रुग्णांना रक्त कमी झाल्यानंतर दिला जाणारा रक्ताचा घटक.
- एफ. एफ. पी. (प्लाझ्मा) - तापसदृश्य रुग्णांना लागणारा रक्तातील प्लाझ्मा घटक.
- आर. डी. पी. (प्लेटलेट) - डेंग्यू, कर्करोगामध्ये रक्तातील प्लेटलेट कमी होतात त्यासाठीचा हा घटक.
- क्रायो - हिमोफेलिया रुग्णांकरिता लागणारा रक्तातील घटक.
- एस. डी. पी. - रक्तातील प्लेटलेटची संख्या ५० हजारांच्या आत असेल तर लागणारा घटक.
- रक्तामधून पसरणाऱ्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी व २ ते ३ तास लागणारी चाचणी अगदी ४५ मिनिटात अचूक, सुरक्षित पूर्ण करणारी केमीफ्लेक्स टेक्नाॅलाॅजी (आर्किटेक्ट आय १००० ॲबाट) यंत्रणा उपलब्ध.
नॅट टेक्नाॅलाॅजी यंत्रणेची गरज
एखाद्या रुग्णाला एच. आय. व्ही.ची लागण झाली की नाही, हे रक्तातूनच कळते. या चाचणीसाठी लागणारा कालावधी ३० दिवसांचा आहे. मात्र, हाच कालावधी अगदी पाच ते सहा दिवसांवर आणणारी नॅट ही नवी यंत्रणा आली आहे. ही यंत्रणा आणण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. त्यासाठी एक ते सव्वा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या यंत्रणेसाठी राज्य शासनाने मदतीचा हात दिल्यास ही यंत्रणा संस्थेला उपलब्ध करता येईल. काळाची गरज ओळखून रक्तदात्यांनी रक्ताबरोबर प्लाझ्मा, प्लेटलेट दानासाठीही पुढे यावे, असेही आवाहन संस्थेचे अध्यक्ष पाटील यांनी केले.