राजर्षी शाहू गौरव ग्रंथ मिळता मिळेना, दहा हजार प्रती संपल्यानंतर नव्याने छपाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 06:13 PM2022-05-06T18:13:51+5:302022-05-06T18:14:12+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षातच शाहू प्रेमी जनता राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजर्षी शाहू ...

Rajarshi Shahu Gaurav Granth was not available, no new printing after ten thousand copies | राजर्षी शाहू गौरव ग्रंथ मिळता मिळेना, दहा हजार प्रती संपल्यानंतर नव्याने छपाई नाही

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ मिळता मिळेना, दहा हजार प्रती संपल्यानंतर नव्याने छपाई नाही

googlenewsNext

विश्वास पाटील

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षातच शाहू प्रेमी जनता राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या राजर्षी शाहू गौरव ग्रंथांपासून वंचित राहात आहे. कोल्हापुरातील इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी तीन वर्षे कष्ट घेऊन राज्य शासनाच्या राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे हा ग्रंथ २०१६ ला (तिसरी सुधारित आवृत्ती) प्रसिद्ध केला. परंतु त्याची दहा हजार प्रतींची पहिली आवृत्ती हातोहात संपल्यावर या ग्रंथाची नव्याने छपाईच न झाल्याने हा ग्रंथ आता उपलब्ध नाही.

शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर डॉ. जाधव यांनी संपादित केलेला गौरव ग्रंथ हा तब्बल १३५० पानांचा आहे. त्याचे प्रकाशन कोल्हापुरात २६ जून २०१६ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या ग्रंथांची त्यावेळी फक्त ३०० रुपये किंमत होती. त्यामुळे पहिल्या आवृत्तीच्या दहा हजार प्रती त्याच वर्षी संपल्या. शासनाने दुसऱ्या आवृत्तीची छपाई लगेच सुरू करायला हवी होती. परंतु तसे घडलेे नाही. त्यामुळेच आज हा ग्रंथ उपलब्ध नाही.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर चरित्र साधने समिती नव्याने स्थापन करण्यात आली नव्हती. आता ती गेल्या २२ एप्रिलला स्थापन झाली आहे. त्यामुळे या समितीकडून हा ग्रंथ तातडीने प्रकाशित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदाचं वर्ष हे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. दि. ६ मे १९२२ रोजी छत्रपती शाहू महाराज मुंबई मुक्कामी परलोकी निघून गेले. महाराजांच्या निधनानंतर अनेक धुरिणांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे लेखन केले. आजही त्यांच्या जीवन कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवण्याचे काम अभ्यासकांकडून सुरू आहे. त्यातील हा गौरव ग्रंथ म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज आहे.


हा ग्रंथ मिळावा म्हणून शासकीय मुद्रणालयात चौकशी केली, परंतु तिथे ग्रंथाची मागणी नोंदवून घेतली जाते. ग्रंथ कधी मिळेल हे सांगितले जात नाही. राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू असून, निदान या महत्त्वाच्या वर्षामध्ये शाहू प्रेमींना हा ग्रंथ उपलब्ध होईल, अशी आशा बाळगूया.  - संदीप वसंतराव जाधव, इतिहासप्रेमी, बहिरेवाडी (ता. पन्हाळा)


हा गौरव ग्रंथ लवकरच कसा उपलब्ध होईल, असा प्रयत्न आहे. त्यासाठी छपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु पाने जास्त असल्याने काही कालावधी लागू शकतो.  - विजय चोरमारे - सदस्य सचिव, राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई

Web Title: Rajarshi Shahu Gaurav Granth was not available, no new printing after ten thousand copies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.