शाहू मिलमध्ये पुन्हा होणार राजर्षी शाहूंच्या कार्याचा जागर, कोल्हापूरकरांना सहभागाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 12:46 PM2023-04-29T12:46:40+5:302023-04-29T12:47:53+5:30
राजर्षी शाहू महाराजांचे दि. ६ मे १९२२ रोजी निधन झाले. यावर्षी या घटनेला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत
कोल्हापूर : दूरदृष्टीने कोल्हापूरला सुजलाम सुफलाम करणारे, पुरोगामी काेल्हापूरचा पाया रचणारे द्रष्टे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त ऐतिहासिक शाहू मिलमध्ये दि. ६ ते १४ मेदरम्यान राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व होणार आहे. यानिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करुया कोल्हापूरकरांनी या पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
राजर्षी शाहू महाराजांचे दि. ६ मे १९२२ रोजी निधन झाले. यावर्षी या घटनेला १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त महाराजांचे विचार व कार्याला उजाळा देण्यासाठी मागील वर्षीपासून कृतज्ञता पर्व साजरे केले जात आहे. याअंतर्गत शाहू मिलमध्ये विविध उपक्रम होणार आहेत. दि. ६ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता समाधी स्थळावर पुष्पांजली वाहण्यात येईल व दहा वाजता १०० सेकंद श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण जिल्हा स्तब्ध राहणार आहे. त्यानंतर शाहू मिलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उत्पादने प्रदर्शन व विक्री महोत्सव होईल.
या महोत्सवात गूळ, कापड, चप्पल, चांदी व सोन्याचे दागिने, माती व बांबूच्या वस्तू, घोंगडी, जान, उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने, पुस्तके, दुग्ध उत्पादने, खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. खाद्यमहोत्सव व तांदूळ, मिरची, गूळ व वन उत्पादने आणि आंबा महोत्सव होणार आहे.
औद्योगिक विकास दालनात विविध उद्योगांना त्यांच्या वस्तूंचे, प्रदर्शन, विक्री व ब्रँडिंग येथून करता येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी रोज हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. हा उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करुया, तसेच शाहू मिलमध्ये आयोजित सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजर्षी शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया, असे आवाहन करण्यात आले आहे.
सराफ व्यावसायिकांना आवाहन
कृतज्ञता पर्वअंतर्गत शाहू मिलमध्ये भरणाऱ्या महोत्सवात कोल्हापुरी दागिन्यांचेही प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. एका व्यवसायासाठी दहा स्टॉल्स उपलब्ध करून दिले जाणार असून, इच्छुक सराफांनी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले आहे.