राजर्षी शाहू महाराज कृषी, उद्योग प्रणेते
By Admin | Published: June 26, 2015 12:09 AM2015-06-26T00:09:51+5:302015-06-26T00:09:51+5:30
राजर्षी छत्रपती! ते अष्टावधानी होते हे तर खरेच, शिवाय ते खरे कर्मवीर होते. त्या कर्माला शिस्त आणि विचार यांची जोड होती. म्हणूनच त्यांची विचारक्रांती यशस्वी झाली.
रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या रयतेच्या उन्नतीसाठी सहकार, सामाजिक, कृषी, उद्योग, आदी विविध क्षेत्रांत भरीव कार्य केले. राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती त्यानिमित्त....प्रासंगिक
माणसाच्या जीवनाचा आलेख त्याच्या कर्तृत्वाने गोंदलेला असतो, असे म्हटले जाते. त्याच्या कर्तृत्वाशी त्याचे कार्य जोडलेले असते. या कार्यावरील त्याची नितांत असलेली निष्ठा त्याची प्रेरणा होऊ शकते. त्या प्रेरणेतून जे कार्य जन्म घेते, ते कार्य उजळते, प्रकाशमान होते. ।।कर्मण्येवाधिकारस्ते।। हा भारतीय तत्त्वज्ञानाचा उद्घोष आहे. कर्म हा माणसाचा अधिकार आहे. तोच ज्यावेळी ध्यास होतो, तेव्हा निखळ परिणाम त्यामधून प्रतित होतात. राजर्षी शाहू आपल्या राजेपणापासून फारकत घेऊन पायउतार झाले आणि रयतेच्या सुख-दु:खाशी समरस झाले. त्यावेळेपासून एका समाजक्रांतीला सुरुवात झाली. ही क्रांती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुरू झाली आणि तिचे पडसाद आजही एकविसाव्या शतकात उमटतात. याचा कर्ता करविता केंद्रबिंदू आहे राजर्षी छत्रपती! ते अष्टावधानी होते हे तर खरेच, शिवाय ते खरे कर्मवीर होते. त्या कर्माला शिस्त आणि विचार यांची जोड होती. म्हणूनच त्यांची विचारक्रांती यशस्वी झाली.
राजर्षी शाहूंच्या वेळच्या कालमान, परिस्थिती यांचा वेध घेता त्यांनी जे काही निर्णय घेतले, ते काल सुसंगतच म्हणावे लागतील. काही निर्णय भविष्याच्या दृष्टीने विसंगत वाटत होते. तरीसुद्घा प्राप्त स्थितीला सामोरे जाण्यासाठी ते निर्णायक क्षणच मानले पाहिजेत. ते ब्रिटिशांचे मांडलिक राजे होते, म्हणून त्यांच्या कार्याला खूप मर्यादा होत्या. त्या मर्यादेत राहूनही त्यांचे कार्य उदंड मानावे लागेल. हे सारे पार पाडताना त्यांना किती क्लेश झाले असतील हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तरीही परिस्थितीला पुरून उरलेला हा राजा कसलेला सेनानीच होता. तो लढवय्या तर आहेच, शिवाय तो हुशार, बुद्घिमान, मुत्सद्दीही आहे. त्यांचे शहाणपणही पराकोटीचे आहे.
त्यांच्या कालखंडात राज्यकर्त्यांनी कर गोळा करावा आणि संरक्षण आणि आपल्या राज्य हद्दीतील अंतर्गत कायदा, सुव्यवस्था पाहावी एवढीच मर्यादित कार्ये राज्यकर्ते आपली मानीत. प्रजेचे आर्थिक जीवनमान सुधारावे असे त्यांच्या कार्यप्रणालीत नव्हते. आर्थिक क्षेत्रात प्रजेने ज्याचे त्याने पाहावे, असे त्यांचे धोरण असे. त्यांना प्रगतिपथावर नेणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या भक्कम करून सुखी करणे हे त्यांच्या खिजगणतीत नव्हते. जो समर्थ असेल तो टिकेल, दुबळा असेल तो मरेल, ही अर्थनीती होती. सरळ धोपटमार्गाने याच पद्घतीने सारा राज्यकारभार चाले. अशावेळी शाहू छत्रपतींनी या नीतीला छेद देऊन समाजातील सर्व घटकांचा विचार मनी-मानसी ठसविला होता. यामध्ये शेती आणि शेतकरी यांचाही विचार त्यांच्या केंद्रस्थानी होता. शेती आणि शेतकरी यांच्याबद्दलची त्यांची आस्था कमालीची संवेदनशील होती. आपला सारा देशच शेतीप्रधान आहे. महाराजांचे राज्यही शेतीप्रधान आहे; पण शेतकरी मात्र नाडलेला, अडलेल्या अवस्थेत जगतो आहे हे एक सत्य होते. म्हणून त्यांच्या क्षमतासुद्घा मर्यादित होत्या.
कोल्हापूर संस्थानाची त्यावेळची लोकसंख्या आठ ते नऊ लाखांच्या दरम्यान होती. आज ती कितीतरी अधिक आहे. या भूमीचा मुख्य व्यवसाय शेतीच होेता. आज उद्योगधंदे वाढले आहेत. सहकारी सूतगिरण्या, साखर कारखाने आणि तत्सम उद्योग, शेतीपूरक उद्योग यांचे जाळे पसरले आहे. महाराजांच्या कारकिर्दीत शेती हा प्रधान व्यवसाय होता; पण शेतीचे लहान-लहान तुकड्यांत विभाजन झाले होते. वाटणी व्यवहाराने अशा लहान तुकड्यांची निर्मिती झाली होती. ती बदलावी आणि त्याचे रूपांतर मोठ्या शेतीमध्ये व्हावे हा त्यांचा विचार होता. म्हणजे शेती किफायतशीर होईल आणि शेतकऱ्याची प्रगती होईल असे त्यांचे स्पष्ट मत होते. हे मत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविले आहे. माणगावच्या परिषदेमध्ये भाषण करताना ते म्हणाले, ‘तुम्ही साधारण माणसी दहा एकर जमीन वाट्याला येईल असे तुमच्या म्हारकीचे तुकडे करा आणि हे उत्पन्न तुमच्यातील वडील असणाऱ्या व्यक्तीकडे चालवायला द्या. म्हणजे सर्वांना अर्धपोटी राहावे लागते ते वाचेल?’ त्यासाठी त्यांनी १९१३ ला अविभाज्य इनामाचा कायदा केला. त्यामध्ये वाटणी करता येणार नाही असे ठरविले.
त्यांनी सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेशही दिला. ते म्हणत, ‘कृषी कर्मापासून दुहेरी उन्नती होते. स्वत:ला सुख तर होतेच, शिवाय सर्व मनुष्य जातीलाही सुख मिळते. कृषी कर्म करताना क्षात्र धर्माला बाधा येते ही समजूत निखालस खोटी आहे. ज्यावर माणूस समाजाची सुव्यवस्था आणि उन्नती अवलंबून आहे, ते कर्म कमीपणाचे आहे ही समजूत वेडगळपणाची आहे. हे असे कर्म करणारा माणूस समाज खऱ्या अर्थाने क्षत्रिय होय. अन्न माणसाला जगविते. त्याचे पालनपोषण करते. त्याला बलवानही करते आणि इतरांनाही जगवा असा संदेश देते. श्रमाची प्रतिष्ठा जगात मोठी, फारच मोठी आहे. शेती ही श्रमाची प्रतिष्ठाच आहे.’
शेती पाण्याखाली येणे अगत्याचे, म्हणून त्यांनी नव्या विहिरी, तलाव, बंधारे, कालवे काढायला प्रोत्साहन दिले. त्यापैकी त्या काळाचा मोठा पाणी प्रकल्प म्हणजे ‘राधानगरी धरण’! ही त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना होय. १९०९ ला या धरणाच्या बांधकामाची सुरुवात झाली. संस्थान लहान, त्याचे उत्पन्न मर्यादित. अशा अवस्थेत या प्रकल्पाला पैसा कमी पडू लागला. अनेक शंकाही उपस्थित होऊ लागल्या. त्यांनी काम तसेच चालू ठेवले. महाराजांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे हा प्रकल्प. हे त्यांचे भव्य स्मारकच मानायला पाहिजे. मात्र, शाहू छत्रपतींच्या कारकिर्दीत हा प्रकल्प पुरा होऊ शकला नाही. पुढे राजाराम महाराज यांनी तो पूर्ण केला.
महाराजांनी शेतीचे विविध प्रयोग आणि त्यासाठी संशोधन यांचाही मागोवा घेतला. जुन्या अवजारांच्या ठिकाणी नवी अवजारे आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची प्रात्यक्षिके, प्रदर्शने, शेती संस्था असे उपक्रमही सुरू केले.
शेतीला उपयुक्त जनावरांची प्रदर्शने त्यांनी घडवून आणली. पारंपरिक पिकांशिवाय नवी पिके घेण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला. पन्हाळा व भुदरगड येथे चहा आणि कॉफीची लागवड करण्याचा प्रयोग केला. शिवाय वेलदोडे, कोको, रबर, ताग, अंबाडी, बटाटे, लाख, ट्रॅपिओका, कंबोडीयन कापूस, आदींची लागवड म्हणजे महाराजांच्या प्रयोगशीलतेचे आणि प्रगतिशीलतेचे द्योतक होय.
उद्योग निर्माणामध्ये ते अग्रेसर ठरले. कोल्हापूरची शाहू मिल हे त्याचे मोठ उदाहरण. येथे पहिल्यांदा सूत आणि नंतर कापड निर्मिती सुरू झाली. इचलकरंजी, कोल्हापूर, शिरोळ, चिंचली, गडहिंग्लज अशा ठिकाणी जिनिंग फॅक्टरी सुरू झाल्या. महाराजांनी माणसांचे जीवनमान सुधारावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली. यामागे विचार, रचनात्मकता आणि त्यांची कळकळ होती. हा अष्टावधानी राजा त्या काळचं लेणंच ठरला. अस्पृश्य जनतेबद्दल त्यांना अत्यंत कळवळा होता, म्हणून ते लोक त्यांना देव मानीत. म. फुले आणि वि. रा. शिंदे यांचा अपवाद वगळता शाहू महाराजांइतका जातिभेद गाडून टाकणारा दुसरा पुढारी झाला नाही. एका महान हेतूने प्रेरित झालेला हा राजा त्याच्या निरिच्छ वृत्तीने ‘राजर्षी’ पदाला पोहोचला. शाहू केवळ राजा नव्हता, केवळ छत्रपती नव्हता, केवळ समाजसुधारक नव्हता, केवळ लोकनेता नव्हता, तर इतिहासाला कलाटणी देणारा आणि एक नवा इतिहास रचणारा महान समाजसुधारक होता.’
--श्यामकांत जाधव