राधानगरीत राजर्षी शाहूंचे स्मारक होणार
By admin | Published: March 29, 2015 09:03 PM2015-03-29T21:03:51+5:302015-03-30T00:26:48+5:30
शाहूप्रेमींमधून समाधान : जिल्हा परिषदेकडून ४० लाखांची तरतूद
राधानगरी : अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले राधानगरी धरणस्थळावरील राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात ४० लाखांची तरतूद केल्याने यासाठी असणारी निधीची अडचण दूर झाली आहे.१०५ वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर फेजिवडे गावाजवळ या धरणाच्या उभारणीस सुरुवात केली. या धरणामुळेच राधानगरीपासून इचलकरंजीपर्यंत कृषी, औद्योगिक क्रांती झाली. सरकारने येथे देशातील दुसरा जलविद्युत निर्मिती प्रकल्प व स्वयंचलित उघडझाप होणाऱ्या दरवाजांची रचना केली. त्यामुळे अनेक अंगाने या धरणाला महत्त्व आहे.
एवढे मोठे धरण उभारूनही धरणस्थळावर कोठेही शाहू महाराजांच्या नावाची साधी पाटीसुद्धा नाही. त्यामुळे येथे त्यांचे स्मारक उभारून त्यांच्या स्मृती जपाव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, जागेची उपलब्धता, आर्थिक अडचण, अंतर्गत हेवेदावे, आदी कारणांमुळे हे स्मारक रेंगाळले आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे सभापती व येथील प्रतिनिधी अभिजित तायशेटे यांनी अर्थसंकल्पात यासाठी भरीव अशी ४० लाखांची तरतूद करून घेतली आहे. यामुळे निधीची असणारी अडचण दूर झाली आहे.पाटबंधारे कार्यालयाशेजारील संरक्षक भिंतीची उंची वाढवून त्यावर म्युस पद्धतीने शिल्पाद्वारे शाहू महाराजांच्या कार्याची माहिती, त्यांचा अर्धपुतळा, सुंदर बगीचा, राजाराम महाराजांच्या कार्याची माहिती व आकर्षक विद्युत सजावटीसह स्मारक तयार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शाहूप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे आजची जिल्ह्याची संपन्नता आहे. त्यांच्या कर्तृत्वाला साजेशे स्मारक उभारण्यासाठी लोकवर्गणीतूनही आणखी काही रक्कम उभी करण्यात येईल. शाहूंचे कार्य प्रेरणादायी असल्याने त्याची माहिती येथे भेट देणाऱ्या सर्वांना व्हावी, अशाप्रकारे त्याची रचना करण्यात येईल.
- अभिजित तायशेटे,
सभापती, अर्थ व शिक्षण समिती,
जिल्हा परिषद