राजर्षी शाहू स्मृती जागर: मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याची शाहू महाराजांकडून पुनर्स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:48 PM2022-04-27T12:48:56+5:302022-04-27T12:49:21+5:30
पहिले महायुद्ध संपल्यानंतर, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांसह सर्व जाती-धर्माच्या सैन्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी १९२१ साली पुण्यातील शनिवारवाड्यासमोर स्मारक बनवून घेतले. हे सैन्यासाठीचे भारतातील पहिले स्मारक होते.
इंद्रजीत सावंत, इतिहास संशोधक
कोल्हापूर संस्थानात लष्कराचे बळकटीकरण आणि भारतीय सैन्य दलात मराठा रेजिमेंटसह बहुजनांच्या भरतीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बहुमोल योगदान आहे. शिवाजी महाराजांपासून मराठ्यांचे सैन्यदळ, घाेडदळ, पायदळ असे लष्करी सामर्थ्य होते, पण पुढे तहात ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थानचे लष्कर कमी केले आणि १८१४ मध्ये गडकऱ्यांनी केलेल्या बंडानंतर फक्त छत्रपतींच्या सुरक्षेसाठीचे लष्कर ठेवले. त्यामुळे लष्करी सामर्थ्याची परंपरा खंडित झाली.
त्यावेळी युद्धावर जाणे म्हणजे, कायमचे परागंदा होणे किंवा मृत्यू हे दोन गैरसमज सर्वसामान्य जनतेत असल्याने, लष्करात भरती व्हायला कोण तयार नसे.
दरम्यान, पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटिशांना सैन्याची कमतरता भासू लागली. ब्रिटिशांवर आलेले संकट हे कोल्हापूर संस्थानचे लष्कर बळकट करण्याची संधी आहे, हे दूरदृष्टीच्या राजर्षी शाहू महाराजांनी हेरले व त्यांनी संस्थानातील मराठे व बहुजनांची लष्कर भरती व्हावी, यासाठी सिमल्याला जाऊन व्हॉइसरॉय यांची भेट घेतली.
मराठ्यांच्या शरीरयष्टीमुळे त्यांच्या सैन्य भरतीत अडचणी येत होत्या, पण शाहू महाराजांनी हवामान व प्रतिकूल परिस्थितीमुळे मराठ्यांची लहान चणी आहे, पण याच काटकपणा व सहनशीलतेच्या गुणांमुळे मराठ्यांनी हिंदुस्थान जिंकून घेतला होता, आजही मराठ्यांची हिंमत व ताकद कमी झालेली नाही, याची आठवण ब्रिटिशांना करून दिली व सैन्यभरती करायला लावली, पण कोल्हापुरात वेगळाच प्रश्न निर्माण झाला, सैन्याच्या रिक्रुटमेंसाठी पार्टी आली की, लोक पळून जायचे. एकदा तर म्हादू गवंडी यांच्या पुढाकाराने नागरिकांनी रिक्रुटमेंटसाठी आलेल्यांनाच कैद केले, त्यावेळी संस्थानात तीन दिवस कर्फ्यू लावावा लागला. अखेर छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांमध्ये दडलेल्या लढवय्या बाण्याची जाणीव करून दिली.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणींचा वारसा सांगून शौर्यजागृत केले. त्यानंतर, कोल्हापुरात लष्करभरतीला त्या काळी एवढा उदंड प्रतिसाद मिळाला की, सर्वाधिक भरती या संस्थानातून झाली. मराठा रेजिमेंट सुरू झाले. पहिल्या युद्धात मराठे इराककडील भागात कुत उल आमरा भागात लढत होते, पण त्यांना वेढा घातल्याने खाण्याचे वांदे झाले. अन्य सैनिक घोड्यांचे मांस खाऊन जगत होते, पण मराठ्यांना घोडे अधिक प्रिय असल्याने त्यांनी नकार दिला. मराठा सैनिक जगला पाहिजे, म्हणून शाहूंनी स्वत: विमानाने जाऊन मी तेथे सैनिकांशी बोलेन, असा प्रस्ताव दिला, पण ब्रिटिशांनी सुरक्षेच्या कारणास्तव तो नाकारला.
युद्धात कोल्हापूर संस्थानची मदत झाल्याने युद्ध संपल्यानंतर झालेल्या शांततेच्या कराराच्या अटी-शर्ती शाहू महाराजांना कळाव्यात, यासाठी एक मसुदा ब्रिटिशांनी शाहू महाराजांना पाठविला होता. पहिल्या महायुद्धाच्या निमित्ताने का असेना, मराठ्यांची सैन्यभरतीची सुरुवात शाहू महाजांच्या प्रयत्नांनी झाली. कोल्हापूरचेच नव्हे, तर मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य पुन्हा उदयाला आले. भारतीय लष्करात आजचे मराठ्यांना स्थान आहे, त्यामागेही शाहूंचीच ही प्रेरणा कामी आली, असे म्हणता येईल. शाहू महाराजांचा लष्कर भरतीचा पैलू मात्र दुर्लक्षित राहिला.
भारतातील पहिले स्मारक
पहिले महायुद्ध संपल्यानंतर, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांसह सर्व जाती-धर्माच्या सैन्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी १९२१ साली पुण्यातील शनिवारवाड्यासमोर स्मारक बनवून घेतले. हे सैन्यासाठीचे भारतातील पहिले स्मारक होते. पुढे तेथे बाजीरावांचा पुतळा बसविण्याचा हालचाली सुरू झाल्यावर, लष्कराने स्मारकाची काळजी घेत, ते आहे असे उचलून आपल्या रेजिमेंटमध्ये पुनर्स्थापित केले.