राजर्षी शाहू स्मृती जागर: शाहू महाराज यांचे धर्मविचार आजही क्रांतिकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:04 PM2022-04-28T16:04:18+5:302022-04-28T16:04:45+5:30

संस्थान इंग्रजांच्या अंकीत असतानाही त्यांनी धर्मसुधारणेच्या प्रयत्नांना जे बळ दिले, त्यातून सत्यशोधक धर्माचा विचार कोल्हापुरात अधिक बळकट झाला. आजही याच विचारांमुळे कोल्हापूर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते.

Rajarshi Shahu Smriti Jagar: Shahu Maharaj Dharma Vichar is still revolutionary | राजर्षी शाहू स्मृती जागर: शाहू महाराज यांचे धर्मविचार आजही क्रांतिकारक

राजर्षी शाहू स्मृती जागर: शाहू महाराज यांचे धर्मविचार आजही क्रांतिकारक

Next

डॉ. देविकाराणी पाटील (लेखिका नव्या पिढीतील इतिहास संशोधक आहेत.)

जो धर्म माणसाला माणसासारखे वागवतो तोच खरा धर्म, हे तत्त्वज्ञान शाहू महाराज खऱ्या अर्थाने जगले. मूळ धर्माला कोठेही धक्का न लावता त्यांनी काळाच्या पुढे जाऊन मांडलेला धर्म विचार आजच्या घडीलाही तितकेच दिशादर्शक, क्रांतिकारक आहेत. संस्थान इंग्रजांच्या अंकीत असतानाही त्यांनी धर्मसुधारणेच्या प्रयत्नांना जे बळ दिले, त्यातून सत्यशोधक धर्माचा विचार कोल्हापुरात अधिक बळकट झाला. आजही याच विचारांमुळे कोल्हापूर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुरोगामी म्हणून ओळखले जाते. कोल्हापुरातील जाती-धर्मातील वीण घट्ट आहे, त्याचे मूळ शाहू महाराजांच्या धर्मविचारात सापडते. त्यांनी धर्मसुधारणेमध्ये केलेले कार्य काळाच्या खूप पुढे पाहणारे होते.

शाहू महाराजांचे धार्मिक विचार त्यांच्या शालेय वयातच दिसू लागले. शिकत असताना १८९१ मध्ये अभ्यास सहलीच्या निमित्ताने ते बनारसला गेले. त्यांचे आवडते गुरु फ्रेझर सोबत होतेच. तेथील मणिकर्णिका कुंडात स्नान करूनच देवदर्शन, असा प्रघात होता; पण कुंडातील घाण पाणी पाहून शाहूंनी त्यामध्ये स्नानास नकार दिला. यावरून पुजाऱ्यांमध्ये खळबळ माजली; पण शाहू महाराज ठाम राहिले. धर्मातील अनिष्ठ चालीरितीवर प्रहार करण्याची शाहू महाराजांची ही सुरुवात होती. यावेळी त्यांचे वय होते १७ वर्षे. पुढे याच विचाराचे गारुड त्यांच्यावर राहिले.

आपला धर्म तर सोडायचा नाही, पण त्यात इतर धर्मातील चांगल्या गोष्टींचा समावेश करून धर्माला अधिक मानवतावादी कसे करता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. देशात, राज्यात त्यावेळी सामाजिक सुधारणांचे वारे जोरात होते. धार्मिक चळवळी सुरू होत्या, धर्मातील अनिष्ठ चालीरितीविरोधात आवाज उठवला जात होता. शाहू महाराजांनी आर्यसमाज, प्रार्थना समाज, थिऑसॉफीकल सोसायटी यांच्या माध्यमातून धर्मसुधारणा सुरू केल्या. हे सुरू असतानाच त्यांना वेदोक्त प्रकरणाला सामोरे जावे लागले. यानंतर त्यांनी धर्मशुद्धीकरणाकडे अधिकच लक्ष दिले. भास्करराव जाधव यांना सत्यशोधक समाजाच्या प्रसारासाठी मदत केली.

बहुजन समाजातील पुराेहित तयार व्हावेत म्हणून वैदिक स्कूल सुरू केले. शंकराचार्यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच.डी. मिळवलेले डॉ. कुर्तकोठी यांची नियुक्ती करून समानतेचा विचार कसा रुजेल, हे पाहिले; पण कुर्तकाेठी यांनी प्रवचनाला दलितांना कुंपणाबाहेरच बसवल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण कोठींना ओळखण्यात चूक केल्याचे शाहू महाराजांच्या लक्षात आले. हा प्रयत्न फसल्यावर त्यांनी बहुजनातील एकाला क्षात्र जगदगुरु म्हणून बसवले. माणूस आणि देव यांच्यात दलाल म्हणून काम करायचे नाही. माणसांनी खांद्यावरून वाहून नेणाऱ्या पालखीत बसायचे नाही, अशा अटी घातल्या. जगदगुरुंना घोडागाडीची सोय करून दिली. असे अनेक पायंडे आहेत, जे काळाच्या पुढे जाऊन समाजसुधारक शाहू महाराज धर्मसुधारकही कसे होते, हे सिद्ध करतात.

अंबाबाई दर्शनासही होता विरोध

स्वत: राजा असतानादेखील शाहू महाराजांना अंबाबाई मंदिरात दर्शन देण्यावरून वाद निर्माण झाला. तत्कालीन प्रथांनुसार परदेश प्रवास करून आल्यावर माणसाची धर्मशुद्धी केली जात होती. समुद्र उल्लंघन करून आल्यावर केल्या जाणाऱ्या या विधीला शाहू महाराजांनी नकार दिला. यावरून त्यांना दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली; पण शाहू महाराज ठाम राहिले. वाद मिटवून पुढे दर्शनही सुरू राहिले.

Web Title: Rajarshi Shahu Smriti Jagar: Shahu Maharaj Dharma Vichar is still revolutionary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.