राजकोट येथे राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कार्यक्रम, खासदार संभाजीराजे यांना विशेष निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 12:19 PM2022-05-03T12:19:50+5:302022-05-03T12:20:25+5:30
राजर्षी शाहू छत्रपती महाराज १८८६ ते १८८९ या काळात राजकुमार कॉलेज येथे शिक्षणास होते.
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राजकुमार कॉलेज (राजकोट) येथे आज, मंगळवारी दुपारी चार वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे प्रमुख उपस्थित असणार आहेत.
स्मृती शताब्दी शुक्रवारी (दि. ६ मे) आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराज ज्या ठिकाणी शिकले, त्या गुजरातमधील राजकुमार कॉलेजला याबाबतची माहिती खासदार संभाजीराजे यांनी पत्राद्वारे दिली. राजर्षी शाहू छत्रपती महाराज १८८६ ते १८८९ या काळात राजकुमार कॉलेज येथे शिक्षणास होते.
त्यांच्या पत्रास उत्तर देताना कॉलेज प्रशासनाने महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे कळवीत, या कार्यक्रमासाठी खासदार संभाजीराजे यांना निमंत्रित केले. या कार्यक्रमास कॉलेजचे प्रमुख विश्वस्त ठाकूर साहेब जितेंद्रसिंहजी, तर भावनगर येथील राजवाड्यातील कार्यक्रमास भावनगरचे महाराज विजयराज सिंह गोहिल, युवराज जयवीरराज सिंह गोहिल उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापुरातील राजमार्गाला भावसिंहजी रोड नाव
शाहू महाराज राजकुमार कॉलेज येथे शिकत असतानाच त्यांचे सहाध्यायी असलेले भावनगरचे महाराज भावसिंहजी यांच्याशी शाहू महाराजांची चांगली मैत्री झाली. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील राजमार्गाला भावसिंहजी रोड असे नाव दिले, तर भावसिंहजी महाराजांनी आपल्या महूआ येथील राजवाड्यास शाहू पॅलेस असे नाव दिले होते. आजही छत्रपती घराण्याचे भावनगर राजघराण्याशी आपुलकीचे संबंध आहेत.
याबद्दल भावनगर राजघराण्याशी देखील मी पत्र व्यवहार केला असता, त्यांनी शाहू महाराजांना आदरांजली देण्यासाठी बुधवार (दि.४ मे) नीलमबाग पॅलेस, भावनगर येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याठिकाणी मी उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी दिली.