चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी राजेभोसले निश्चित
By admin | Published: April 27, 2016 11:38 PM2016-04-27T23:38:21+5:302016-04-28T00:19:06+5:30
निवड ५ मे रोजी : संचालकांच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत समर्थ पॅनेलचे प्रवर्तक आणि महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षपदावर बुधवारी १२ संचालकांच्या झालेल्या अनौपचारिक बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदाची निवड ५ मे रोजी होणार आहे. राजेभोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनेलची घोषणा झाल्यानंतर राजेभोसले यांनी महामंडळाच्या ३९०७ सभासदांपर्यंत भेटून पॅनेलची ध्येय-धोरणे सांगितली. त्यांच्या या कामामुळे १४ पैकी १२ संचालक महामंडळाच्या निवडणुकीत निवडून आले. याबद्दल बुधवारी सायंकाळी पाच
वाजता राजेभोसले यांच्यासह १२ संचालकांनी महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली.
महामंडळाच्या फलकाला पुष्पहार अर्पण करून सभागृहात संचालकांची अनौपचारिक बैठक झाली. त्यात अध्यक्षपदासाठी मेघराज राजेभोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
महामंडळाचा कारभार
यापुढे पारदर्शक आणि सभासदांना केंद्रबिंदू मानून
करणार आहे. मागील संचालकांनी केलेल्या घोटाळ्यांचा अभ्यासही यादरम्यान करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल. महामंडळाचा यापुढचा कारभार ‘पेपरलेस’ असणार आहे. महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी माझीच निवड सहकाऱ्यांनी केली असून, ही निवड ५ मे रोजीच्या पहिल्या बैठकीत होईल. त्यातून पुढील कार्यकारिणीही निवडण्यात येईल.
- मेघराज राजेभोसले,
प्रवर्तक, समर्थ पॅनेल
विजय पाटकर १८ मतांनी विजयी
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ने १२ जागा मिळवत बहुमत मिळवले. विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी सुशांत शेलार यांच्यावर १८ मतांनी विजय मिळविला.
बुधवारी मध्यरात्री या मतमोजणीदरम्यान प्रचंड गोंधळ व धक्काबुक्की झाल्याने पोलिसांना मतदान केंद्रावर पाचारण करावे लागले. दरम्यान, अभिनेता विभागाची मतमोजणी सुरू झाल्यावर प्रथम २ मतपत्रिकांचा ताळमेळ बसेना म्हणून समर्थ पॅनेलच्या उमेदवार सुशांत शेलार यांनी हरकत घेतली. त्यावर निवडणूक समितीने पुन्हा मतपत्रिका तपासल्या, त्यात दोन मतपत्रिकांचा ताळमेळ लागला. संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अभिनेता गटात विजय पाटकरांना ५८४, तर सुशांत शेलार यांना ५६६ मते पडली. त्यामुळे पाटकर १८ मतांनी विजयी झाले. त्यावर शेलार यांनी फेरमतमोजणी घ्यावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. के. व्ही. पाटील, यांच्याकडे केली होती.