राजे बँक सभासदांना १५ टक्के लाभांश देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:24 AM2021-09-25T04:24:12+5:302021-09-25T04:24:12+5:30
कागल : राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेने सभासदांना जास्तीत जास्त लाभांश मिळावा ही भूमिका जपली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...
कागल : राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेने सभासदांना जास्तीत जास्त लाभांश मिळावा ही भूमिका जपली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने लाभांश देण्यास निर्बंध घातले. त्यावर लाभांश वाटप करण्यासाठी थेट रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागणारी राजे बँक एकमेव होती. आता २०२० - २०२१ वर्षासाठी पंधरा टक्के लाभांश देत आहोत, अशी घोषणा अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी केली.
बँकेची १०४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने पार पडली. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या आशीर्वादाने व समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या बँकेने कोरोना महामारीच्या साथीतही चांगली कामगिरी बजावली आहे. यामध्ये कर्मचारी वर्ग सभासद खातेदारांचे योगदान आहे. आप्पासो हुच्चे यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी नोटीस वाचन केले, तर उपाध्यक्ष नंदकुमार माळकर यांनी आभार मानले. बँकेचे सर्व संचालक उपस्थित होते.
चौकट
२ कोटी ५५ लाखांचा नफा.
अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी अहवाल सालातील बँकेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. बँकेचे भाग भांडवल ४ कोटी ४४ लाख. एकूण निधी ३४ कोटी ३२ लाख, ठेवी ३७७ कोटी ०८ लाख, गुंतवणूक १७५ कोटी ४० लाख, कर्जे २१० कोटी दिली आहेत. २ कोटी ५५ लाखांचा नफा झाला आहे. निव्वळ एन.पी.ए शून्य टक्के, तर ऑडिट वर्ग ''अ'' कायम आहे..
छायाचित्र : कागल येथील राजे बँकेच्या ऑनलाईन पद्धतीने झालेल्या १०४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष एम. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.