Kolhapur Politics: शिरोळ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी सामना रंगणार, राजू शेट्टी मैदानात उतरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:37 PM2024-08-26T13:37:04+5:302024-08-26T13:37:51+5:30

यड्रावकरांच्या भूमिकेकडे लक्ष : उल्हास पाटील, गणतपराव, घाटगेही मैदानात

Rajendra Patil-Ydravkar, Ulhas Patil, Ganpatrao Patil, Raju Shetty will fight in Shirol assembly constituency | Kolhapur Politics: शिरोळ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी सामना रंगणार, राजू शेट्टी मैदानात उतरणार?

Kolhapur Politics: शिरोळ विधानसभा मतदारसंघात बहुरंगी सामना रंगणार, राजू शेट्टी मैदानात उतरणार?

संदीप बावचे

शिरोळ : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. शिरोळविधानसभा मतदारसंघातही लढतीची उत्सुकता लागून राहिली आहे. विद्यमान आमदार डॉ . राजेंद्र पाटील-यड्रावकर शिवधनुष्य उचलणार की अपक्ष राहणार, याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गत निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्यामुळे माजी आमदार उल्हास पाटील यांनीदेखील दावा सुरू केला आहे. शरद पवार यांच्या भेटीमुळे दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील तुतारी वाजवणार का? याबाबतही तर्कवितर्क आहेत. 

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना आमदारकीची ऑफर दिली होती. त्यामुळे महायुतीतून घाटगे यांच्या उमेदवारीची चर्चा असताना घाटगे यांनी उघडपणे आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. स्वाभिमानीतील मरगळ दूर करण्यासाठी राजू शेट्टी विधानसभेच्या मैदानात उतरतील का? याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

गत विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतून राज्यमंत्रिपद मिळवले. राजकीय भूकंपात ते शिंदे सेनेसोबतच राहिले. आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेकडून निवडणूक लढवणार का, याबाबत तर्कवितर्क असले तरी ते अपक्ष निवडणूक लढतील असे संकेत आहेत.

महाविकासमध्ये पेच..

गत निवडणुकीत उल्हास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे या विधानसभा मतदारसंघात दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर शिरोळच्या जागेबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता नाही. श्री दत उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनीदेखील विधानसभेची तयारी सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चेला उधाण आले होते. क्षारपड जमिनीच्या माध्यमातून पाटील यांनी मोठे काम उभे केले आहे. पवार यांच्या भेटीमुळे गणपतराव पाटील तुतारी वाजवणार का? याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

माधवराव घाटगे यांचे मौन

लोकसभा निवडणुकीवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना थेट आमदारकीची ऑफर दिली होती. घाटगे यांचे कारखान्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. भाजपकडून त्यांनी तालुक्यात निधी आणून विकासकामे केली आहेत. भाजपकडून घाटगे यांचा चेहरा पुढे येत असला तरी घाटगे यांनी अजूनही उघडपणे भूमिका जाहीर केलेली नाही.

तर शेट्टी मैदानात..

स्वाभिमानीकडून सावकार मादनाईक यांचा आतापर्यंत पराभव झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानीमध्ये मरगळ आली आहे. यामुळे राजू शेट्टी यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यामुळे शेट्टी मैदानात उतरणार का, अन्य कोणाला संधी देणार याकडेही कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

२०१९ चे चित्र

राजेंद्र पाटील-यड्रावकर - ९०,०३८
उल्हास पाटील - ६२,२१४
सावकार मादनाईक - ५१,८०४
मताधिक्य - २७८२४

Web Title: Rajendra Patil-Ydravkar, Ulhas Patil, Ganpatrao Patil, Raju Shetty will fight in Shirol assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.