शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:45 AM2024-04-27T11:45:34+5:302024-04-27T11:58:46+5:30
शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
Kolhapur Lok Sabha ( Marathi News ) :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे मैदानात असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना तिकीट देण्यात आलं आहे. थेट शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशातच आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.
"सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असल्याने त्यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. काँग्रेस नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे त्यांनी लोकसभा उमेदवारीची माळ शाहू महाराजांच्या गळ्यात घातली आणि शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला आहे. त्यांनी राजकारणापासून दूर राहावं, अशी आमची इच्छा होती. कारण छत्रपती हेच सर्वांत मोठं पद आहे. मात्र आता ते एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले," अशा शब्दांत राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, जिथं-जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते तिथं तिथं एनडीएच्या उमेदवाराचा विजय होतो, त्यामुळे सतेज पाटील यांचा जळफळाट झाला आहे, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला आहे.
सतेज पाटील काय म्हणाले होते?
सतेज पाटील यांनी एका प्रचारसभेत बोलताना संजय मंडलिकांवर जोरदार टीका केली. "करवीरच्या गादीची पुण्याई मोठी आहे, कोल्हापूर जिल्ह्यावर गादीचे अनंत उपकार आहेत.त्यामुळे गादीचा सन्मान राखा, गादीवर बोलू नका. हवे तर माझ्यावर बोला, मी उत्तर द्यायला समर्थ आहे, असं आम्ही खासदार संजय मंडलिक यांना सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी गादीचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, मी राजकारणात कसलेला पैलवान आहे. शडडू ठोकलाय, माती अंगावर घेतली आहे, चितपट केल्याशिवाय राहणार नाही," असं आव्हान पाटील यांनी दिलं होतं.
कोल्हापूरच्या मैदानात घुमणार मोदींचा आवाज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा शनिवारी (दि. २७) तपोवन मैदानावर होणार असून, त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सभेच्या ठिकाणी खासगी ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विविध सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.