विजयाची हॅटट्रिक मीच करणार : राजेश क्षीरसागर यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 04:10 PM2019-05-10T16:10:50+5:302019-05-10T16:21:37+5:30
निवडणुका येतात जातात, मी निवडणुक आली म्हणून कधी काम केलो नाही. जनतेत राहून जनतेच्या अडचणी सोडवल्या, टोल, एलबीटीसारख्या चळवळी, रुग्ण सेवा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. त्या बळावरच येत्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
कोल्हापूर : निवडणुका येतात जातात, मी निवडणुक आली म्हणून कधी काम केलो नाही. जनतेत राहून जनतेच्या अडचणी सोडवल्या, टोल, एलबीटीसारख्या चळवळी, रुग्ण सेवा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आलो. त्या बळावरच येत्या निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणार असल्याचा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर भगिनी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, भगिनी मंचच्या अध्यक्षा वैशाली क्षीरसागर, नगरसेविका अनुराधा खेडकर, तेजस्विनी इंगवले, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, परिवहन समिती सभापती राहूल चव्हाण, नगरसेवक नियाज खान, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, मंगल साळोखे, पूजा भोर उपस्थित होत्या. हा महोत्सव उद्या रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.
क्षीरसागर म्हणाले, निवडणुका आल्या की लोक जनतेसमोर येतात. आता माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय पण मी घाबरत नाही. भगिनी महोत्सव, युवा महोत्सव, ढोल ताशा स्पर्धा, गणेशोत्सव, श्रावण महोत्सव अशा विविध उपक्रमातून जनतेत राहतो. विधानसभेत कोल्हापुरचे प्रश्न मांडण्यापासून ते निकाली लागेपर्यंत त्यांचा पाठपुरावा आणि चळवळीत कार्यरत आहे. नागरिकांना माझं काम माहित आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्या पाठबळावरच मी पुन्हा निवडून येईन.
महापौर सरिता मोरे यांनी महोत्सवामुळे महिला व बचत गटांना आर्थिक बळ मिळाल्याचे सांगितले. वैशाली क्षीरसागर यांनी प्रास्ताविकांत महिलांना मान सन्मान व सांस्कृतिक विरंगुळा मिळत असल्याचे सांगितले. ऋतुराज क्षीरसागर यांनी स्वागत केले. ऋषिकेश देसाई यांनी सुत्रसंचलन केले. दुपारच्या सत्रात लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा झाल्या. सायंकाळी मेघा घाटगे व ग्रूपने लावण्यरंग हा लावण्यांचा कार्यक्रम सादर केला.