कोल्हापूर उत्तरच्या जागेवर पुन्हा राजेश क्षीरसागर यांनाच संधी शक्य

By विश्वास पाटील | Published: August 25, 2024 12:08 PM2024-08-25T12:08:21+5:302024-08-25T12:08:21+5:30

महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिंदेसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत.

Rajesh Kshirsagar has a chance at Kolhapur North | कोल्हापूर उत्तरच्या जागेवर पुन्हा राजेश क्षीरसागर यांनाच संधी शक्य

कोल्हापूर उत्तरच्या जागेवर पुन्हा राजेश क्षीरसागर यांनाच संधी शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जोरदार फिल्डिंग लावली असल्याने ही जागा शिंदेसेनेला जाण्याची शक्यता ठळक झाली आहे. तसे झाल्यास नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हेच महायुतीचे या मतदारसंघातील उमेदवार असू शकतात. सध्याच्या घडामोडी तर तशाच आहेत. कोल्हापुरात गुरुवारी झालेल्या लाडकी बहीण योजना वचनपूर्ती मेळाव्यातही क्षीरसागर यांनी स्वत:चे जोरदार मार्केटिंग केले आहे.

महायुतीमध्ये ही जागा कोणत्या पक्षाला जाणार याबद्दल शिंदेसेना व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. दोन्हीकडून त्याबद्दलचे दावे केले जात आहेत. त्याचवेळेला महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसची असेल हे खरे असले तरी उमेदवार कोण याबद्दलचा संभ्रमही कायम आहे. जिल्ह्यातील दहापैकी हा एकच मतदारसंघ असा आहे की जिथे दोन्ही आघाड्यांतून जागा व उमेदवार याबद्दलचा संभ्रम तुलनेत जास्त आहे. त्यामुळे पडद्याआड भेटीगाठी. मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

१. कोल्हापूर उत्तरमध्ये १९९० ला शिवसेनेला पहिल्यांदा दिलीप देसाई यांच्या रूपाने गुलाल मिळाला. त्यानंतर झालेल्या एकूण ८ निवडणुकीत ५ वेळा शिवसेना जिंकली. ३ वेळा काँग्रेसला गुलाल लागला.

२. भाजपने २०१४ मध्ये निवडणुकीत प्रथमच चिन्हावर स्वतंत्र लढून ४० हजार मते घेतली होती. त्यानंतर २०२२ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेसह महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. त्यामध्ये भाजपचा मतांचा आकडा ७८ हजारांवर गेला. मतांची थेट दोघांतच विभागणी झाल्याने मतांचा टक्का वाढल्याचे दिसते. त्याच आधारावर भाजपने ही जागा आपल्यालाच मिळायला हवी, असा दावा केला आहे.

३. भाजपकडून सत्यजित कदम यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. परंतु त्यांना आणि भाजपलाही अगोदर महायुतीत ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठीच झटावे लागणार आहे. महायुतीच्या राजकारणात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाला वजन वाढले आहे. त्यामुळे लोकसभेलाही त्यांनी भाजपकडून काही जागा ताकद लावून आपल्याकडे खेचून घेतल्या. आताही तसे होण्याची शक्यता जास्त आहे.

४. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या शहरी प्रभुत्व असलेल्या जागा आहेत. त्यामुळे त्या दोन्ही एकाच पक्षाला देण्याऐवजी त्यातील एक जागा आम्हाला मिळायला हवी, असा मुख्यमंत्र्यांचाच आग्रह आहे. याउलट आम्ही पोटनिवडणुकीत ७८ हजार मते मिळवली आहेत. शिवाय कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या दोन जागा सोडल्यास भाजपच्या वाट्याला हक्काची जागाच नाही. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, असे भाजपला वाटते. परंतु मुख्यमंत्र्यांनी हट्ट केला तर तो मोडून भाजप पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे या घडीला ही जागा शिंदेसेनेच्याच वाट्याला जाईल, अशा हालचाली आहेत. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडूनही त्यास दुजोरा मिळत आहे.

५. महायुतीत या घडामोडी असताना इकडे महाविकास आघाडीत उमेदवार कोण येथूनच सुरुवात आहे. आमदार जयश्री जाधव यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर वाटते. पण त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत.छत्रपती घराण्यातील उमेदवार रिंगणात असणार नाही, त्यामुळे काँग्रेसपुढे उमेदवारीचा पेच आहे. शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दोन पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ, तरुण आणि चोवीस तास सर्वांना उपलब्ध असणारा उमेदवार आणि जुन्या पेठातील पाठबळ या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत...त्याचा विचार करून पक्षाने आपला विचार करावा असे त्यांना वाटते...

६. शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी या जागेवर जोरदार दावा सांगितला आहे. कोल्हापुरातील तालीम संघापासून ते देवल क्लबपर्यंत अशा विविध संस्था, संघटनांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम करून दाखवले आहे. स्वच्छ चारित्र्य आहे. राजकीय भूमिका पक्की आहे. गेली तीस वर्षे कोल्हापूरच्या जडणघडणीशी ते संबंधित आहेत. त्यामुळे आपल्याला संधी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

७. काँग्रेसकडून मराठा महासंघाचे कार्यकर्ते वसंतराव मुळीक यांचेही नाव चर्चेत येत आहे. गेल्या निवडणुकीतही काँग्रेसकडून त्यांचे नाव पुढे आले होते. मराठा समाज संघटनांसाठी ते गेली अनेक वर्षे रस्त्यावर आहेत. बहुजन समाजाचा माणूस अशी त्यांचीही प्रतिमा आहे. प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर असलेला माणूस ही त्यांची ओळख आहे. ते सामान्य आहेत ही एक जमेची बाजू आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार खासदार शाहू छत्रपती यांच्या विजयासाठी झटले आहेत.

एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल

जयश्री जाधव काँग्रेस : ९७ हजार ३३२ (५४.३४ टक्के)
सत्यजित कदम : ७८०२५ (४३.५६ टक्के)
नोटा : १७९९
एकूण मते : १ लाख ७९ हजार ११८
मताधिक्य : १९ हजार ३०७

Web Title: Rajesh Kshirsagar has a chance at Kolhapur North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.