मंत्रीपदासाठी राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांच्यात चुरस; हसन मुश्रीफांचे उपमुख्यमंत्रिपद चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:34 PM2024-12-03T12:34:58+5:302024-12-03T12:35:41+5:30

विनय कोरे की अमल महाडिक निर्णय होईना

Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar contest for minister post; Hasan Mushrif deputy chief ministership in discussion | मंत्रीपदासाठी राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांच्यात चुरस; हसन मुश्रीफांचे उपमुख्यमंत्रिपद चर्चेत

मंत्रीपदासाठी राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर यांच्यात चुरस; हसन मुश्रीफांचे उपमुख्यमंत्रिपद चर्चेत

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा समावेश निश्चित मानला जात आहे, तर शिंदेसेनेमध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार प्रकाश आबिटकर आणि एकूण तिसऱ्यांना आमदार झालेले राजेश क्षीरसागर यांच्यात स्पर्धा आहे. जनसुराज्यचे विनय कोरे किंवा आपल्याच पक्षाचे अमल महाडिक यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची, असा प्रश्न भाजप नेत्यांसमोर आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ९ दिवस झाल्यानंतर आता गुरुवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला संधी मिळणार या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. राष्ट्रवादीकडून सलग सहाव्यांदा निवडून आलेले आणि २२ वर्षे मंत्री म्हणून कार्यरत राहिलेले मुश्रीफ यांचे मंत्रिपद निश्चित असून त्यांच्या कार्यकर्त्यांना केवळ त्यांना कोणते खाते मिळणार याची प्रतीक्षा आहे.

आबिटकर हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. २०१९ ला शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार पराभूत झाले असतानाही आबिटकर निवडून आले होते. समुदायांचे प्रश्न मांडणे, विकासकामांचा वेगवान पाठपुरावा ही त्यांची कार्यपद्धती आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पाचहून अधिक वर्षे काम केलेले क्षीरसागर यांची धडाडी आणि समोर असलेली कोल्हापूर महापालिकेची निवडणूक यामुळे क्षीरसागर यांना अधिक संधी असल्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि चंद्रदीप नरके यांनी देखील आपापल्या परीने जोडण्या लावल्या असल्याचे सांगण्यात येते.

कोरे यांचे पारडे जड

आमदार विनय कोरे की आमदार अमल महाडिक या पेचात भाजप असल्याचे सांगण्यात येते. वारणेसारखा मोठा सहकार समूह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक, चौथ्यांदा आमदार आणि गेली पाच वर्षे विनाअट भाजपला पाठिंबा या कोरे यांच्या जमेच्या बाजू आहेत. महाडिक हे दुसऱ्यांना जरी निवडून आले असले तरी व्यापक पातळीवर कोरे यांचा फायदा करून घेण्याची भाजपची मानसिकता असल्याने कोरे यांचे पारडे जड मानले जात आहे.

मुश्रीफ यांचे उपमुख्यमंत्रीपद चर्चेत

मुश्रीफ हे कदाचित उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी मुंबईत चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी एकीकडे ‘कटेंगे तो बटेंगे’ अशी भूमिका मांडण्यात आल्याने मुस्लीम समाजात महायुतीविषयी थोडी नाराजी असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांचा विचार करून महायुतीविषयीचा हा गैरसमज दूर करण्यासाठी मुश्रीफ यांना हे पद द्यावे, असा एक मतप्रवाह पुढे आल्याचे सांगण्यात येते. प्रचारादरम्यान मुश्रीफ यांनी मी राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो, असे विधान केले होते याचाही दाखला दिला जात आहे.

Web Title: Rajesh Kshirsagar, Prakash Abitkar contest for minister post; Hasan Mushrif deputy chief ministership in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.