..तर काय बिघडले असते?, जिल्हा बँक निवडणुकीवरुन राजेश क्षीरसागरांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:01 PM2022-01-01T17:01:15+5:302022-01-01T17:10:07+5:30

शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे.

Rajesh Kshirsagar question to the ruling party from Kolhapur District Bank election | ..तर काय बिघडले असते?, जिल्हा बँक निवडणुकीवरुन राजेश क्षीरसागरांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

..तर काय बिघडले असते?, जिल्हा बँक निवडणुकीवरुन राजेश क्षीरसागरांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जागा वाटपातील तिडा न सुटल्याने शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे.

सत्ताधाऱ्यांवर शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधाऱ्यांकडूनही या टिकेला प्रत्युत्तर दिले जात आहेत. यातच आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही प्रसिध्दी पत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांना सवाल केला आहे.

जिल्हा बँकनिवडणूकीत शिवसेनेने केवळ एक जागा जादा मागितली होती. ती एक जागादेखील देण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीने नकार दिल्यामुळेच जिल्हा बँकेची निवडणूक लागली. महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळसह इतर सहकारी संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली आहे. जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदार या लढ्यात शिवसेनेसोबत राहील आणि जिल्हा बँकेतील मक्तेदारी मोडून निघेल, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत गोकुळ प्रमाणेच महाविकास आघाडी म्हणून लढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टीने चर्चाही सुरू होती. जिल्हा बँकेत सध्या खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी खासदार निवेदीता माने हे दोन विद्यमान संचालक आहेत. त्या वगळता आम्ही आणखी एक जादा जागा मागत होतो. गटाबाबत आमचा कोणताही आग्रह नव्हता. कोणत्याही गटातील द्या, पण शिवसेनेला आणखी एक जादा जागा हवी होती.

तसा प्रस्तावही आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दिला होता. नेहमीप्रमाणे त्यावर चर्चेचे गुर्हाळ झाले. शिवसेनेचे पॅनेल होऊ शकणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतू शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व नेते एकवटले आणि पुढाकार घेऊन पॅनेलसाठी सूत्रे हलविली.

शिवसेनेला जिल्हा बँकेच्या निवडणूकीत तगडे उमेदवार मिळणार नाहीत, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना वाटत होते. मात्र त्यांच्या अपेक्षांना सुरूंग लावत शिवसेनेने पॅनेल तर केलेच, त्याबरोबरच पॅनेलमधून तुल्यबळ उमेदवारही दिले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीने जर सुरूवातीलाच एक जागा देण्यास नकार दिला असता तर तालुक्यातील विकास सेवा संस्था गटातील बारा उमेदवारही निवडणूकीत उतरवले असते. जिल्ह्यात आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा... अशा अविर्भावात वागणार्या मंडळींना त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे. या निवडणूकीत सभासदांनी शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहनी त्यांनी यावेळी केले.

Web Title: Rajesh Kshirsagar question to the ruling party from Kolhapur District Bank election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.