मी अधिकारी असतो तर ठोकून काढले असते: राजेश क्षीरसागर
By समीर देशपांडे | Published: September 16, 2022 09:46 PM2022-09-16T21:46:51+5:302022-09-16T21:47:46+5:30
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. महिलांचा अवमान सहन करणार नाही, असे राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. महिलांचा अवमान सहन करणार नाही. मी जर त्या ठिकाणी अधिकारी म्हणून असतो तर ठोकून काढले असता, कसला माज आलाय ते बघायला पाहिजे अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख रवि इंगवले यांना लक्ष्य केले आहे.
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी क्षीरसागर याच्या बूथवर बसलेल्या महिलांकडेपाहून घाणेरडे हातवारे केल्याचा आणि शब्द वापरल्याचा आरोप यावेळी क्षीरसागर यांनी इंगवले यांच्यावर केला आहे. ते म्हणाले, मिरवणूक झाल्यानंतर दोनच दिवसात संबंधित महिलांनी जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेतली आणि निवेदन दिले. त्यानंतर खातरजमा करून गुन्हा दाखल झाला आहे.
सार्वजनिक जीवनात काम करताना कसं वागायंचं हे ठरवलं पाहिजे. ही आमची संस्कृती नाही. काही दिवस जावू दे. ही सगळी मंडळी झिरो होतील असे भविष्यही क्षीरसागर यांनी वर्तवले. यावेळी वैशाली क्षीरसागर, सुजित चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.