कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजेश लाटकर गाठीभेटीत व्यस्त, वसंतराव मुळीक जरांगेंच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:30 PM2024-10-31T12:30:26+5:302024-10-31T12:31:06+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतरही ती ऐनवेळी बदलली गेलेल्या राजेश लाटकर यांनी सदरबाजार, विचारेमाळ परिसरातील ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतरही ती ऐनवेळी बदलली गेलेल्या राजेश लाटकर यांनी सदरबाजार, विचारेमाळ परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. उमेदवारी नाकारलेले वसंतराव मुळीक मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे भेटीस आंतरवाली सराटी येथे गेले आहेत. रात्री उशिरा जरांगे - मुळीक यांची भेट झाली. चर्चेचा तपशील मात्र समजला नाही.
नाराज झालेल्या लाटकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी, जरी लाटकर नाराज झाले असले तरी त्यांची समजूत काढली जाईल, त्यांना बेदखल करून आम्ही पुढे जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दोन दिवसात आमदार पाटील व खासदार शाहू छत्रपती हे लाटकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, लाटकर यांना, त्यांच्या घरी सदरबाजार, विचारेमाळ येथील नागरिक भेटायला जात आहेत. त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ऐनवेळी उमेदवारी बदलल्यामुळे लाटकर यांना सहानुभूती मिळत आहे.
काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेले वसंतराव मुळीक मराठायोद्धा मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गेले आहेत. जरांगे पाटील यांनी विधानसभा लढविण्याबाबत दिलेल्या सूचना तसेच कोल्हापुरातील दहा विधानसभा जागांबाबत या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उदय देसाई, विजय पाटील, प्रताप नाईक, अवधूत पाटील हेदेखील गेले आहेत.